फेब्रुवारीमध्ये हेल्मेट सक्तीचे करण्याचा विचार पोलीस दल गंभीरपणे करीत असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले. शहरातील प्रत्येक महाविद्यालय व शिकवणी वर्गाच्या व्यवस्थापकांनी हेल्मेटची सक्ती करण्यास पुढाकार घ्यावा. जी व्यक्ती हेल्मेट वापरणार नाही त्यावर संस्थांनी कारवाई करावी, अशी सूचना त्यांनी केली. एमजीएममध्ये वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने ते बोलत होते.
शहराची लोकसंख्या १४ लाख व वाहनांची संख्या ११ लाख आहे. वाहतुकीसाठी मात्र केवळ २५० पोलीस आहेत. त्यांच्यावरही भार आहे. वाहतुकीचे व्यवस्थापन पोलीस व नागरिक यांच्या समन्वयाशिवाय होणार नाही. त्यामुळे अधिक चांगल्या वाहतूक व्यवस्थेसाठी नागरिकांनी सहभाग नोंदवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अरेरावी करणाऱ्या रिक्षाचालकांवर काही प्रमाणात नियंत्रण आले असले तरी वाहतूक व्यवस्था पूर्णत: सुधारलेली नाही. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. उद्यापासून (बुधवार) हेल्मेटसक्ती करण्यात येणार असल्याचे एमजीएम संस्थेचे सचिव अंकुश कदम यांनी सांगितले. विद्यार्थी संघटनांकडून हेल्मेटसक्तीस विरोध झाल्यास कोणाचीही गय केली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. एमआयटीने गेल्या महिन्यापासूनच त्यांच्या कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्तीचे केले आहे. आता एमजीएमनेही पुढाकार घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व अर्थसंकल्प २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Helmet compulsion