पीटीआय, नवी दिल्ली : कर्जाच्या बदल्यात बँका व वित्तसंस्थांकडे गहाण ठेवलेल्या समभागांना सोडवण्यासाठी प्रवर्तकांकडून ११.१४ कोटी अमेरिकी डॉलरची (सुमारे ९२० कोटी रुपये) परतफेड करण्यात आली असल्याचे अदानी समूहाने सोमवारी स्पष्ट केले. सप्टेंबर २०२४ च्या मुदतीपर्यंत ही तारण कर्जे समूहातील वेगवेगळय़ा कंपन्यांसाठी घेण्यात आली होती, पण मुदतपूर्तीपूर्वीच ती फेडण्यात आल्याचे सांगण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी ट्रान्समिशन या कंपन्यांचे समभाग गहाण ठेवण्यात आले होते, असे अदानी समूहाने निवेदनात म्हटले आहे. अदानी समूहाविरुद्धचे ताजे प्रतिकूल वातावरण आणि त्या परिणामी समूहातील कंपन्यांच्या समभागांच्या किमतीत झालेली मोठी घसरण पाहता हे पाऊल टाकण्यात आले. प्रवर्तकांच्या समभागाधारित कर्जदायित्व कमी करण्याच्या वचनबद्धतेला अनुसरून ही मुदतपूर्व कर्ज परतफेड केली गेली असल्याचे सांगण्यात आले.

या मुदतपूर्व परतफेडीनंतर, अदानी पोर्ट्सचे १,६८२.७ लाख ताबेगहाण समभाग मुक्त होतील, जे प्रवर्तकांच्या १२ टक्के भागभांडवली हिश्श्याचे प्रतिनिधित्व करतात.  अदानी ग्रीनच्या बाबतीत, प्रवर्तकांच्या ३ टक्के भागभांडवली हिश्श्याचे प्रतिनिधित्व करणारे २७५.६ लाख समभाग मुक्त केले जातील. तसेच, प्रवर्तकांच्या भागहिश्श्यांपैकी १.४ टक्के अर्थात अदानी ट्रान्समिशनचे ११७.७ लाख समभाग हे ताबेगहाणातून सोडविले जातील.

घसरणीचा पिच्छा कायम

मुंबई : अमेरिकेतील ‘हिंडेनबर्ग रिसर्च’च्या प्रतिकूल अहवालाला दोन आठवडे लोटत आले, तरी त्या परिणामी अदानी समूहातील बहुतांश समभाग सोमवारी गडगडताना दिसून आले. समूहातील कंपन्यांच्या बाजार भांडवलातील एकत्रित नुकसान यामुळे सुमारे ९.५ लाख कोटी रुपयांहून अधिक झाले आहे. सोमवारचे भांडवली बाजारातील व्यवहार थंडावले तेव्हा अदानी समूहातील १० पैकी सहा कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. अदानी ट्रान्समिशन १० टक्के, तर अदानी टोटल गॅस, अदानी पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी व अदानी विल्मर हे समभाग प्रत्येकी ५ टक्क्यांनी गडगडले.  अदानी एंटरप्रायझेस ०.७४ टक्क्यांनी घसरला. त्या उलट अदानी पोर्ट्स ९.४६ टक्क्यांनी, तर अंबुजा सीमेंट, एसीसी आणि एनडीटीव्ही हे समभाग वधारले. 

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 920 crores prepayment of loan from adani promoters to redeem shares ysh