Adani Total Gas : अदानी टोटल गॅस कंपनीबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. अदानी टोटल गॅस लिमिटेडने मंगळवारी जाहीर केलं की त्यांच्या (अदानी टोटल गॅस) कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) पराग पारीख यांनी राजीनामा दिला आहे. तसेच त्यांच्या जागेवर आता नव्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू असून लवकरच ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्या संदर्भातील घोषणा येत्या काही दिवसांत केली जाईल असं कंपनीने म्हटलं आहे.
मुख्य वित्तीय अधिकारी पराग पारीख यांनी त्यांचा राजीनामा ३० सप्टेंबर दिला असून त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आल्याचं कंपनीने म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त फायनान्शिअल एक्स्प्रेसने दिलं आहे. तसेच पराग पारीख यांच्या राजीनाम्याबाबत कंपनीने त्यांच्या फाइलिंगद्वारे स्टॉक एक्सचेंजला कळवल्याचंही वृत्तात म्हटलं आहे.
राजीनामा देण्याचं कारण हे बाहेरील व्यावसायिक संधींच्या त्यांच्या इच्छेमुळे ते कंपनीच्या मुख्य वित्तीय अधिकारी पदाचा राजीनामा देत असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. तसेच वर नमूद केलेल्या कारणाशिवाय माझ्या राजीनाम्याचं दुसरं कोणतंही महत्वाचं कारण नसल्याचं पारीख यांनी म्हटलं आहे.
तसेच अदानी टोटल गॅसने पारीख यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचं कौतुक केलं आहे. कंपनी नवीन मुख्य वित्तीय अधिकारी नियुक्त करण्याच्या प्रक्रियेबाबत पुढील काही दिवसांत या संदर्भात सूचना येईल,” असं कंपनीने दाखल केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
पराग पारिख कोण आहेत? (Who is Parag Parikh)
अदानी टोटल गॅस कंपनीत पराग पारिख यांनी जवळपास सहा वर्षांपेक्षा जास्त काळ काम केलं. त्यांनी मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून देखील अतिशय उल्लेखनीय काम केल्याचं सांगितलं जातं. मात्र, आता सहा वर्षांहून अधिक काळ काम केल्यानंतर त्यांनी कंपनीचं सीएफओ पद सोडलं आहे.
दरम्यान, पराग पारिख यांच्या लिंक्डइननुसार, पारिख यांना भारतातील विविध क्षेत्रांतील कामकाजाचा जवळजवळ तीन दशकांचा अनुभव आहे. अदानी टोटल गॅसमध्ये सामील होण्यापूर्वी पारिख यांनी जीएमआर ग्रुपमध्ये जवळजवळ पाच वर्षे काम केलेलं आहे. जिथे त्यांनी २०१९ मध्ये पायाभूत सुविधा समूहासाठी ग्रुप हेड ऑफ फायनान्स म्हणून काम केलं.
जानेवारी २०२५ पासून पारिख हे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या (FICCI) CFO कौन्सिलचे सदस्य आहेत. तसेच त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, पारिख यांनी मुंबईच्या जय हिंद कॉलेजमधून वाणिज्य विषयात बॅचलर पदवी व मुंबई विद्यापीठातून वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.