नवी दिल्ली : परदेशी गुंतवणूकदारांकडून भारतातील वित्तीय आणि बँकिंग क्षेत्रात पुढील काही महिन्यांत ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल, अशी त्यांनी घोषणा केली आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी सोमवारी दिली.
गोयल यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर टिप्पणीत म्हटले आहे की, जागतिक पातळीवर अस्थिरतेचे वारे असले तरी भारत हा गुंतवणुकीसाठी मरुद्यान ठरत आहे. भारत हे गुंतवणुकीसाठी प्राधान्यक्रमाचे ठिकाण बनत आहे. अडचणीच्या काळातही भारतातील थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ चांगला आहे. गेल्या काही महिन्यात जगभरातील गुंतवणूकदारांनी भारतातील वित्तीय आणि बँकिंग क्षेत्रात ५० हजार कोटी रुपये गुंतविण्याची घोषणा केली आहे. भारतीय अर्थव्यवस्था आकर्षक वाटत असल्याने थेट परकीय गुंतवणुकीत वाढ होत आहे.
देशातील थेट परकीय गुंतवणूक चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून तिमाहीत १५ टक्क्यांनी वाढून १८.६२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. त्यात अमेरिकेतून आलेली गुंतवणूक या तिमाहीत तिपटीने वाढून ५.६१ अब्ज डॉलर झाल्याचे सरकारी आकडेवारी दर्शवते.
प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारावरील भारत आणि अमेरिका यांच्यातील चर्चा सौहार्दपूर्ण वातावरणात सुरू असल्याचे गोयल यांनी शनिवारी पत्रकारांना माहिती दिली. अमेरिकेला भारताच्या कृषी क्षेत्रात स्वारस्य आहे आणि त्या संबंधाने सवलतींची त्यांची मागणी आहे, या पार्श्वभूमीवर शेतकरी, मच्छीमार आणि एमएसएमई क्षेत्रांच्या हिताचे रक्षण भारताकडून केले जाईल आणि भारताचे शेतकरी, मच्छीमार आणि एमएसएमई क्षेत्राचे हिताला बाधा आणणारा कोणताही करार होऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील भारताचे अधिकृत शिष्टमंडळ सरलेल्या आठवड्यात अमेरिकेत व्यापार चर्चा करण्यासाठी वॉशिंग्टनमध्ये होते आणि ही चर्चा तीन दिवस सुरू राहिली.
भारत आणि युरोपीय महासंघातील मुक्त व्यापार करारासाठी (एफटीए) सुरू असलेल्या वाटाघाटींना चालना देण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हे २३ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या बर्लिन जागतिक संवादामध्ये सहभागी होण्यासाठी युरोपमध्ये असणार आहेत. त्यानंतर, युरोपीय महासंघाचे व्यापार आयुक्त मारोस सेफकोविक यांचीही त्यांनी भेट घेणे अपेक्षित आहे. ६ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर दरम्यान दोन्ही बाजूंमधील १४ व्या फेरीच्या चर्चेच्या समाप्तीनंतर गोयल यांचा हा दौरा आहे.