मुंबई: भांडवली बाजारातील दमदार तेजीकडे आकर्षित होऊन, एकीकडे अनेक हवशेनवशे बाजारातील जोखमीकडे दुर्लक्ष करून आणि ती न समजून घेता ट्रेडिंग करू लागले आहेत, तर दुसरीकडे स्वयंघोषित तज्ज्ञ बाजार नियामक ‘सेबी’च्या परवानगी किंवा मान्यतेविना प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमाद्वारे त्यांना शेअर खरेदी-विक्रीसंबंधित टिप्स देऊन ईप्सित साधताना दिसतात. गुंतवणूकदारांचे हात पोळून काढणाऱ्या या प्रकाराची दखल घेत ‘सेबी’ने कडक कारवाईस सुरुवात केली आहे.
सेबीच्या अंमलबजावणी पथकाने २० ऑगस्ट रोजी भल्या पहाटे तथाकथित स्वतःला गुंतवणूक गुरू म्हणणाऱ्या अवधूत साठे यांच्या कर्जत येथील कार्यलयात छापे टाकले. सेबीच्या उपमहाव्यवस्थापकांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांनी साठे यांच्या कार्यालयावर कारवाई केली.
बाजार तज्ज्ञ, गुंतवणूक गुरू आणि व्यापार सल्लागार म्हणवणाऱ्या अवधूत साठे यांच्या कर्जत येथील ट्रेडिंग अकॅडमीमध्ये सेबीने कथितरित्या शोध आणि जप्तीची कारवाई केल्याचे वृत्त आहे. सेबीने अधिकृतपणे अवधूत साठे यांचे नाव घेतले नसले तरी, मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, सेबीच्या अधिकाऱ्याने याची पुष्टी केली आहे.
साठे यांच्यावर कारवाई करण्याआधी न्यायालयाची मंजुरी आगाऊ मिळवली होती तसेच सेबीने फॉरेन्सिक विश्लेषणासाठी डिजिटल उपकरणे आणि ट्रेडिंग संबंधित आकडेवारी जप्त केली आहे, असे या कारवाईशी परिचित असलेल्या दोन व्यक्तींनी सांगितले.
अवधूत साठे काय करतात?
मुंबईतील अवधूत साठे हे देशातील मोठ्या आर्थिक प्रभावकांपैकी एक आहेत, ज्यांचे यूट्यूबवर नऊ लाखांवर अधिक सबस्क्राइबर आहेत. साठे हे यूट्यूब चॅनेल आणि सेमिनारद्वारे लोकांना शेअर बाजाराचे ज्ञान देतात. यामध्ये ते बाजारातील गुंतवणूक धोरणे, बाजार विश्लेषण आणि चार्ट पॅटर्न अशा अनेक विषयांवर चर्चा करतात. मात्र भुक्कड पेनी स्टॉक्सच्या शिफारशीतून रग्गड कमावल्याचा संशय सेबीने व्यक्त केला आहे.
साठे मुख्यतः किरकोळ गुंतवणूकदारांना गुंतवणूक सल्ला आणि चार्टच्या साहाय्याने शेअर खरेदी कशी करावी आणि हमखास नफा कसा मिळवावा यासह त्यांच्याकडील गुंतवणूकदारांनी मिळवलेल्या यशोगाथा ते दाखवून अधिक किरकोळ गुंतवणूकदारांना आकर्षित करत असत. त्यांच्या कर्जत येथील ट्रेडिंग अकादमीच्या माध्यमातून साठे स्वतःला बाजार तज्ज्ञ म्हणून गुंतवणूकदारांपुढे सादर करत असत.
सेबीने कारवाई का केली?
सेबी आर्थिक प्रभावकांच्या कारवायांवर सतत लक्ष ठेवत असल्याने, बाजार नियामकाला साठे यांच्या काही कार्यक्रमांबद्दल आणि वर्गांबद्दल तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. साठे पेनी शेअर्सची जाहिरात करणाऱ्या ऑपरेटर्सशी संबंध ठेवून किरकोळ गुंतवणूकदारांची दिशाभूल करू शकतात, म्हणून सेबीने कर्जत येथील ट्रेडिंग अकॅडमी येथे छापे टाकले.
शेअर बाजार शिक्षणाच्या नावाखाली तरुणांची दिशाभूल करणे आता खपवून घेतले जाणार नाही, असा मजबूत संदेश देणे हा या मोहिमेचा उद्देश आहे, असे सेबीचे पूर्णवेळ सदस्य कमलेश चंद्र वार्ष्णेय एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
फिनफ्लुएन्सर आणि वृत्तवाहिन्यांवरील तज्ज्ञांबाबत ‘सेबी’चे म्हणणे काय?
फिनफ्लुएन्सर समाजमाध्यमांत असलेल्या त्यांचा प्रभावाचा फायदा घेत गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचा सल्ला देण्याचे काम करतात. त्यातील अनेक जण गुंतवणुकीवर अव्वाच्या सव्वा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवितात. त्याला भुलून अनेक जण गुंतवणूक करतात आणि फसतात. हे फिनफ्लुएन्सर यूट्यूब, एक्स, इन्स्टाग्राम आणि टेलिग्राम या समाजमाध्यमांवर गुंतवणुकीबाबत सल्ला देतात. त्यांच्याकडून शेअर बाजारासंबंधी अनेक अभ्यासक्रमदेखील चालविले जातात. शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या नावाखाली भांडवली बाजारातील गुंतवणुकीचा सल्ला देण्यात येतो आणि यासाठी ग्राहकांकडून पैसे घेतले जातात. खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन ग्राहकांना भुलविले जाते. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) केलेल्या तपासानुसार, फिनफ्लुएन्सर ग्राहकांना अनेक पटीने नफा कमावून देण्याचे खोटे आश्वासन देतात. याचबरोबर वृत्तवाहिन्यांवरील ‘तज्ज्ञ’ किरकोळ गुंतवणूकदारांना प्रभावित करण्याच्या स्थितीत असल्याचा फायदा घेतात. त्यायोगे या मंडळींनी बेकायदेशीरपणे स्वतः बाजारातून अवैधरीत्या मोठा नफा कमावला आहे. या कथित तज्ज्ञांनी दूरचित्रवाणीच्या माध्यमातून दिलेल्या सल्ल्याच्या विपरीत भांडवली बाजारात स्थिती घेऊन बाजारातून मोठा नफा कमावल्याचे तपासात आढळून आले.
सेबीने अवैधरित्या नफा मिळविणाऱ्यांचे वर्गीकरण कसे केले आहे?
सेबीने संपूर्ण प्रकरणाची आणि संशयित संस्थांनी बजावलेली भूमिका अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी फसवणुकीच्या प्रकारांची विभागणी केली आहे. यात नफा कमावणारे, त्यांना नफ्यासाठी सक्षम करणारे आणि अतिथी तज्ज्ञ सल्ला आणि अवाजवी उलाढाल वाढविणारे अर्थात ‘व्हॉल्यूम क्रिएटर्स’ अशा श्रेणी केल्या आहेत. नफा कमावणाऱ्या, म्हणजेच प्रॉफिट मेकर्स श्रेणी यात ज्यांनी कंपन्यांच्या समभागांच्या शिफारशींच्या आगाऊ (इनसाइडर) माहितीच्या आधारे कथितपणे केलेले व्यवहार करून नफा कमावला ते येतात. दुसऱ्या श्रेणीमध्ये समभाग शिफारशींच्या आगाऊ माहितीच्या आधारे नफा कमावण्यास कथितपणे साहाय्य केले ते अतिथी तज्ज्ञ येतात. तिसऱ्या वर्गात अशा कथित अतिथी तज्ज्ञांचा समावेश आहे, जे वृत्तवाहिन्यांवर वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सामील झाले आणि त्यांनी प्रेक्षकांना समभागांच्या शिफारशी केल्या. समाजमाध्यमांवर स्वतःची उपस्थिती व व्यापक अनुनय असणाचा गैरफायदा त्यांच्याकडून उचलला जातो.