Bank Holidays in June 2024: मे महिना संपून जून महिना सुरु व्हायला काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. दैनंदिन बँकासंदर्भातील कामे करण्यासाठी तुम्हाला आधीच नियोजन करावे लागते. बँक हा सर्वसामान्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. खात्यातून पैसे काढण्यापासून ते ड्राफ्ट काढण्यापर्यंत सर्व कामांसाठी बँकेत जावे लागते. अशातच वर्षाचा सहावा महिना सुरु होण्यापूर्वी बँक एकूण किती दिवस बंद राहणार आहेत, हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रत्येक महिन्याप्रमाणे जून महिन्यात सुध्दा बँकांना सुट्टी असणार आहे. जून महिन्यात शाळा महाविद्यालयांचेही नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालय यांचे शुल्क, विद्यार्थ्यांचे गणवेश आणि इतर साहित्य घेण्यासाठी पालकांची लगबग सुरु होईल, मात्र हे सर्व करत असाताना तुम्हाला जर बँकेतून आर्थिक व्यवहार करायचे असतील तर येत्या जून महिन्यात तुमच्या कामाचा खोळंबा होऊ नये म्हणून आम्ही सुट्ट्यांची यादी देत आहोत. नुकतंच आरबीआयने म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली गेली आहे. संपूर्ण जून महिन्यात किती सुट्ट्या आहेत हे या यादीत जाहीर केलेलं आहे. नेमक्या किती सुट्ट्या आहेत? याबद्दल जाणून घेऊया. 

तुम्हाला माहित आहे का, भारतातील बँकांच्या सुट्ट्या या १८८१ च्या राज्य सरकार, केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश कायद्यांतर्गत सूचीबद्ध आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) तर्फे दरवर्षी संपूर्ण वर्षासाठी बँकांच्या सुट्टीचे कॅलेंडर प्रकाशित केले जाते. हे कॅलेंडर सर्व बँकांद्वारे फॉलो करणे अनिवार्य असते. ग्राहकांच्या सोयीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया महिना सुरू होण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते, जेणेकरून ग्राहकांना कोणत्याही गैरसोयीला सामोरे जावे लागू नये. यानुसार यंदा जून महिन्यात किती व कोणते बँक हॉलिडे असणार हे पाहूया..

जून २०२४ मध्ये महाराष्ट्रातील ‘या’ दिवशी बंद असणार बँक!


तारीख 
दिवस निमित्त
२ जून २०२४रविवारसार्वजनिक सुट्टी
८ जून २०२४ (दुसरा शनिवार)सार्वजनिक सुट्टी
९ जून २०२४रविवारसार्वजनिक सुट्टी
१६ जून २०२४रविवार सार्वजनिक सुट्टी
१७ जून २०२४सोमवारबकरी ईद
२२ जून २०२४(चौथा शनिवार)सार्वजनिक सुट्टी
२३ जून २०२४रविवार सार्वजनिक सुट्टी
३० जून २०२४ रविवार सार्वजनिक सुट्टी

बँक बंद असताना तुमचे काम कसे पूर्ण करायचे?

बँकांना असलेल्या दीर्घ सुट्ट्यांमुळे अनेक वेळा महत्त्वाची कामे रखडतात. त्यातील नवीन तंत्रज्ञानामुळे ग्राहकांची अनेक कामे सुलभ झाली आहेत. तुम्ही घरबसल्या नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग किंवा UPI द्वारे एका बँक खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता. पैसे काढण्यासाठी तुम्ही एटीएम वापरू शकता.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bank holidays june 2024 banks will remain closed on 8 days in june 2024 check check dates list here pdb