मुंबईः सोन्याच्या किमतीची उच्चांकी धाव अथकपणे सुरूच असून, नुकत्याच त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रति औंस ४,००० डॉलरचा विक्रमी टप्पा ओलांडला आहे. मात्र हा ऐतिहासिक अत्युच्च स्तरही फिका वाटावा असे २०२६ मध्ये सोन्याच्या ५,००० डॉलरच्या पातळीचा अंदाज जागतिक आघाडीच्या संस्थेकडून सोमवारी वर्तविण्यात आला.

ल्यवान धातूंच्या किमतीचा चढता क्रम पुढेही सुरू राहिल, याबाबत सर्वच जागतिक संस्था आणि विश्लेषकांमध्ये एकमत असून, त्यांनी २०२६ साठी व्यक्त केलेल्या अंदाजांची सरासरी ही प्रति औंस ४,४०० डॉलर अशी आहे. तथापि ‘रॉयटर्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, बँक ऑफ अमेरिका ग्लोबल रिसर्चने सोमवारी मौल्यवान धातूंच्या किमतीचा अंदाज या सर्वांमध्ये सर्वाधिक नोंदविला आहे. या बहुराष्ट्रीय बँकेच्या मते, २०२६ मध्ये सोन्याचा भाव प्रति औंस ५,००० डॉलरपर्यंत वाढेल.

गेल्या आठवड्यात ८ ऑक्टोबर रोजी सोन्याचा भाव पहिल्यांदाच औंसासाठी ४,००० डॉलरच्या वर गेला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरुद्ध पुन्हा एकदा व्यापार युद्धाच्या धमक्या दिल्यानंतर गुंतवणूकदारांमधील अस्वस्थता वाढली आहे. त्यांनी त्यांच्या पैशाचे सुरक्षित-आश्रयस्थान म्हणून सोन्याला पसंत दिली असून, यातून सोमवारी सोन्याच्या वायदा किमती ४,०७९.६२ डॉलर या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या.

शिवाय अमेरिकेतील व्याजदरात कपातीची अपेक्षा या धातूच्या आकर्षणात आणखी भर घालत आहे. जवळच्या काळात जरी चढ-उतार दिसून आले तरीही २०२६ मध्ये सोने आणखी झळाळण्याची अपेक्षा आहे. एकंदर गुंतवणूक मागणीत १४ टक्क्यांच्या वाढीचा दर पाहता, या वर्षाप्रमाणेच २०२६ मध्ये सोने ५,००० डॉलर/औंस असे वाढू शकते, असे बँक ऑफ अमेरिकाने नमूद केले आहे.

भारतातील किमतीचे अंदाज काय?

औंस हे मौल्यवान धातूच्या वजनाचे आंतरराष्ट्रीय एकक असून, एक औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम इतके वजन भरते. त्या अंगाने आंतरराष्ट्रीय किमती ५,००० डॉलरवर जाणार याचा अर्थ, भारतात सोन्याच्या घाऊक किमती या प्रति १० ग्रॅमसाठी १,५६,९६० रुपयांचा स्तर (डॉलर/ रुपया विनिमय दर ८९ गृहित धरल्यास) २०२६ मध्ये दाखवतील.

यात आयात शुल्क, जीएसटी, स्थानिक कर आणि वाहतुकीचा खर्च जमेस धरल्यास, भारतात सोने पावणे दोन लाख रुपयांचा स्तरावर दिसल्यास ते आश्चर्याचे ठरणार नाही. सोन्याच्या किमती विद्यमान २०२५ मध्ये आतापर्यंत ५० टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. १९७० नंतर सोन्यातील तेजीचे हे अभूतपूर्व वर्ष असून, तेजीची मालिका २०२६ सालातही अनुभवास येईल, असा जागतिक संस्थांचा कयास आहे.

बँक ऑफ अमेरिकापाठोपाठ गोल्डमन सॅक्सने गेल्या आठवड्यात (७ ऑक्टोबर) सोन्याच्या किमतीबाबत अंदाज सुधारून, ते २०२६ डिसेंबरपर्यंत ४,९०० डॉलरची पातळी दाखवेल, असे म्हटले आहे. कॉमर्जबँकेने ४,२०० डॉलर, डॉइशे बँकेने ४,३०० डॉलर, यूबीएसने ४,२०० डॉलर असे त्यांचे अंदाज सुधारून घेतले आहेत.