मुंबई : आघाडीची बँकेतर वित्तीय कंपनी कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडने १,००० रुपये दर्शनी मूल्याच्या सुरक्षित, विमोचनयोग्य अपरिवर्तनीय रोख्यांची (एनसीडी) सार्वजनिक विक्री येत्या ३० सप्टेंबरपासून प्रस्तावित केली आहे. विविध मुदत कालावधीच्या सहा मालिकांद्वारे खुल्या होत असलेल्या रोख्यांमधून वार्षिक किमान ८.५५ टक्के ते कमाल ९.७० टक्क्यांपर्यंत प्रभावी लाभ गुंतवणूकदारांना मिळविता येईल.

देशाच्या वित्तीय सेवा क्षेत्रात १४ वर्षे कार्यरत असलेली कॅप्री ग्लोबल कॅपिटल ही ठेवी न स्वीकारणारी आघाडीची बँकेतर वित्तीय कंपनी आहे. सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना कर्ज, परवडणाऱ्या घरांसाठी कर्ज, सोने तारण कर्ज आणि बांधकाम क्षेत्राला वित्तसाहाय्य असे तिचे प्रमुख व्यवसाय विभाग आहेत. या रोखे विक्रीतून २०० कोटी रुपये उभारण्याचे कंपनीने प्रस्तावित केले आहे. अतिरिक्त भरणा झाल्यास आणखी २०० कोटी रुपये राखून ठेवण्याच्या (ग्रीन शू ऑप्शन) पर्यायाद्वारे एकूण ४०० कोटी रुपये उभारले जाणार आहेत.

इन्फोमेरिक्स आणि ॲक्युइट या पतमानांकन संस्थांनी कंपनीच्या रोख्यांना अनुक्रमे ‘एए सकारात्मक’ आणि ‘एए स्थिर’ असे सुरक्षित मानांकन बहाल केले आहे. १८ महिने, ३६ महिने, ६० महिने आणि १२० महिने असे चार मुदत कालावधीचे पर्याय गुंतवणूकदारांना उपलब्ध आहेत. यातील १२० महिन्यांच्या पर्यायात गुंतवणूकदार वार्षिक ९.७० टक्के दराने लाभ मिळवू शकतील. विक्रीपश्चात या डिमॅट स्वरूपातील रोख्यांची मुंबई शेअर बाजार अर्थात बीएसईवर सूचीबद्धता केली जाणार आहे.

रोखे विक्री १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत जरी खुली राहणार असली तरी भरणा पूर्ण झाल्यास त्या आधीच ती बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. भरणा पूर्ण झाल्यानंतर आलेल्या अर्जदारांना रोख्यांचे प्रमाणशीर स्वरूपात वाटप केले जाईल. गुंतवणूकदारांना किमान १० रोखे अर्थात १०,००० रुपयांची गुंतवणूक अनिवार्य आहे. त्यानंतर १,००० रुपयांच्या पटीत त्यांना अर्ज करता येईल. या रोखे विक्रीचे ट्रस्ट इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीक़डून व्यवस्थापन पाहिले जात आहे.

रोखे विक्रीद्वारे उभारलेल्या निधीपैकी किमान ७५ टक्के निधी कॅप्री ग्लोबल कॅपिटलच्या पुढील कर्ज वितरणासाठी, वित्तपुरवठ्यासाठी आणि कंपनीच्या विद्यमान कर्जांच्या व्याज आणि मुद्दलाची परतफेड करण्यासाठी वापरला जाईल. ३० जून २०२५ अखेर, २४,७५२.८३ कोटी रुपयांच्या व्यवस्थापनयोग्य मालमत्तेसह, ११,५४६ कर्मचारी आणि १,१३८ शाखांद्वारे ही कंपनी ५.६० लाख ग्राहकांना सेवा देत आहे.