पीटीआय, साणंद

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशातील पहिल्या अर्धसंवाहक अर्थात सेमीकंडक्टर प्रकल्पाचे काम विद्यमान कॅलेंडर वर्षाअखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे. अहमदाबादजवळील साणंद येथे चिप निर्मितीतील अमेरिकी कंपनी मायक्रॉन टेक्नॉलॉजीच्या सेमीकंडक्टर जुळणी (असेंब्ली) आणि चाचणी सुविधेचे बांधकाम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होईल, असे टाटा प्रोजेक्ट्सकडून मंगळवारी सांगण्यात आले.

देशाच्या पहिल्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचे ६० टक्के काम आधीच पूर्ण झाले आहे, तर उर्वरित काम या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल, असे टाटा प्रोजेक्ट्सचे प्रकल्प संचालक अमित अग्रवाल म्हणाले. साणंद औद्योगिक क्षेत्रात सुमारे ५० एकर जागेत ही सुविधा उभारली जात आहे आणि गेल्या वर्षी जुलैमध्ये बांधकाम सुरू झाले. ही सेमीकंडक्टर असेंब्ली, टेस्टिंग, मार्किंग आणि पॅकेजिंग (एटीएमपी) सुविधा टाटा प्रोजेक्ट्सने मायक्रोनसाठी बांधली आहे.

एटीएमपी सुविधा ही मूलतः बॅकएंड फॅब सुविधा असते, जिथे सेमीकंडक्टरची चाचणी, पॅकेजिंग आणि मार्किंग केले जाते. हे कदाचित जगातील सर्वात मोठे बॅक-एंड सेमीकंडक्टर फॅब केंद्र असेल. आतापर्यंत, ६० टक्के काम पूर्ण झाले असून एकूण ३,५०० कर्मचारी येथे काम करत आहेत. मायक्रॉनने दिलेल्या मसुद्यानुसार, सिव्हिल वर्क, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि प्लम्बिंगचे काम आणि अभियांत्रिकीशी संबंधित कामे पूर्ण केल्यानंतर डिसेंबर २०२५ पर्यंत हा सुविधा प्रकल्प मायक्रोनला सोपवू, असे टाटा प्रोजेक्ट्सचे प्रकल्प संचालक अमित अग्रवाल म्हणाले.

जून २०२३ मध्ये, गुजरात सरकारने साणंद येथे २.७५ अब्ज डॉलरच्या सेमीकंडक्टर असेंब्ली आणि चाचणी सुविधा स्थापन करण्यासाठी मायक्रॉनसोबत सामंजस्य करार केला. हा सुविधा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर सुमारे ५,००० प्रत्यक्ष नोकऱ्या आणि अतिरिक्त १५,००० अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होण्याची आशा आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Country first semiconductor project to be completed by december print eco news amy