मुंबई: रोखेसंलग्न अर्थात डेट म्युच्युअल फंडातून गुंतवणूक काढून घेण्याचे सत्र अखेर तिसऱ्या महिन्यात एप्रिलमध्ये थांबले. गेल्या महिन्यात या फंडात २.१९ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

म्युच्युअल फंड उद्योगाची शिखर संघटना ‘ॲम्फी’ने गेल्या महिन्यातील म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीची आकडेवारी जाहीर केली त्यानुसार, डेट फंडातून मार्चमध्ये २.०२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेण्यात आले. सलग दोन महिने गुंतवणूक काढून घेण्यात आल्यानंतर, तिसऱ्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये या फंडात गुंतवणुकीचा ओघ वाढला. त्यामुळे डेट फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत वाढ होऊन एप्रिलमध्ये ती १७.५७ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. त्याआधीच्या महिन्यात ती १७.०२ लाख कोटी रुपये होती.

डेट फंडातील गुंतवणूकदारांची संख्या मार्चमध्ये ६८.९१ लाख होती. त्यात एप्रिलमध्ये १.४४ लाखांनी वाढ होऊन, ती ७९.३६ लाखांवर पोहोचली. गेल्या महिन्यात डेट फंडाच्या १६ पैकी १२ प्रकारांमध्ये गुंतवणुकीचा ओघ दिसून आला. त्यातही लिक्विड फंडात सर्वाधिक १.१८ लाख कोटी रुपयांचा ओघ दिसून आला. विशेष म्हणजे, मार्चमध्ये लिक्विड फंडातून काढून घेण्यात आलेल्या गुंतवणुकीपैकी ८९ टक्के रक्कम एप्रिलमध्ये पुन्हा गुंतविण्यात आली.

एकूण २.७७ लाख कोटींची गुंतवणूक

एकूण म्युच्युअल फंड उद्योगात गेल्या महिन्यात २.७७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली झाली. त्या आधीच्या मार्चमध्ये १.६५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेण्यात आली होती. गेल्या महिन्यात गुंतवणुकीचा ओघ वाढल्याने फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता ७० लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

डेट फंडामधील गुंतवणुकीपैकी लक्षणीय हिस्सा लिक्विड प्रकारांमध्ये आहे. यामागे गुंतवणूकदारांचे अल्पकालीन प्राधान्य धोरण दिसून येत आहे. पुढील चांगल्या संधीच्या शोधात गुंतवणूकदार आहेत.

अंकुर पुंज, व्यवस्थापकीय संचालक, इक्विरियस वेल्थ