मुंबईः केंद्र सरकारच्या योजनेनुरूप देशभरात स्मार्ट स्कूल प्रकल्प रावबिण्याच्या मोहिमेला पाठबळ म्हणून, बेन्क्यू इंडियाला चालू वर्षात शाळांमधील पारंपरिक फळ्याची जागा घेणारे ३० ते ४० हजार इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनेल विकले जाण्याची अपेक्षा आहे, असे कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

तैवानस्थित डिस्प्ले उपायोजनांतील बहुराष्ट्रीय कंपनी बेनक्यू कॉर्पोरेशनचा भाग असलेली ही कंपनी भारतात सरकारी क्षेत्रातील शाळा, विद्यालयांसाठी इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनेलची आघाडीची पुरवठादार आहे. विद्यार्थ्यांसाठी सहज-सुलभ तंत्र उपायांद्वारे शिक्षणात परिवर्तन घडवून आणणे असा कंंपनीचा उद्देश आहे, असे बेन्क्यूचे भारत आणि दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक राजीव सिंग म्हणाले.

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी शालेय शिक्षणात सुरू झाली असून, त्याचा अविभाज्य भाग असलेले डिजिटल क्लासरूम हे बेन्क्यूच्या पथ्यावर पडलेले दिसत आहे. केवळ फ्लॅट पॅनेलच नव्हे, तर प्रोजेक्टर आणि मॉनिटर ही अन्य उत्पादनेही शिक्षण क्षेत्रातील व्यवसायाला गती देणारे महत्त्वाचे घटक आहेत, असे सिंग म्हणाले.

देशात शालेय शिक्षणाच्या स्तरावर सध्या एक कोटींच्या घरात वर्गखोल्या असून, त्यापैकी स्मार्ट क्लासरूमचे प्रमाण जवळपास सहा लाख इतके आहे. यापैकी ४ लाख स्मार्ट क्लासरूमची सज्जता ही बेन्क्यूच्या उत्पादनांतून झाली आहे. अर्थात एकट्या बेन्क्यू इंडियाचा वाटा ६६ टक्क्यांच्या घरातील आहे.

बेन्क्यूने देशातील अनेक राज्य सरकारांशी भागीदारी केली आहे, ज्यायोगे सरकारी शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम प्रकल्प सक्रियपणे राबविला जात आहे. कंपनीच्या भारतातील एकूण महसुलात सरकारशी भागीदारीतून जवळपास २० टक्के योगदान येते, असे सिंग यांनी स्पष्ट केले. शिवाय खासगी शैक्षणिक संस्थांशी देखील कंपनीचे चांगले संबंध असून, शिक्षण क्षेत्रातील तिचा बाजार हिस्सा २०२४ मधील २७.५ टक्क्यांवरून २०२५ च्या पहिल्या तिमाहीत ३३.९७ टक्क्यांपर्यंत वाढला असल्याचे ते म्हणाले.

गेल्या वर्षी पावसाळी अधिवेशनात सरकारने संसदेला दिलेल्या माहितीनुसार, देशात नवीन १,२६,८८१ शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूमना मान्यता देण्यात आली आहे. सध्या खासगी शिक्षणसंस्थांमध्ये, प्रोजेक्टर, डिजिटल फळा किंवा इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनेलचा वापर ३० टक्क्यांच्या आसपास आहे आणि सरकारी शाळांच्या पातळीवर मात्र हेच प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे सरकारी शाळांच्या पातळीवर ही एक मोठी व्यवसाय संधी आहे, असे सिंग म्हणाले.

पारंपारिक फळ्यापेक्षा आकाराने मोठे, इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनेल हे स्पर्श-सक्षम डिजिटल डिस्प्ले असतात. प्रोजेक्टरची कार्यक्षमता आणि संगणकाच्या कामगिरीला एकत्र करणाऱ्या या डिजिटल फळ्याची किंमत ही किमान ७५ हजार रुपये ते अडीच लाख रुपयांच्या श्रेणीत आहे.