पीटीआय, नवी दिल्ली
देशाचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन १० फेब्रुवारी २०२५ पर्यंत वार्षिक तुलनेत १९ टक्क्यांनी वाढून २१.८८ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे, असे केंद्रीय अर्थमंत्रालयाने बुधवारी स्पष्ट केले. परताव्यापूर्वी एकूण प्रत्यक्ष कर संकलन या कालावधीत १९.०६ टक्क्यांनी वाढून २०.६४ लाख कोटी रुपये झाले आहे, जे मागील वर्षाच्या याच कालावधीपर्यंत १८.३८ लाख कोटी रुपये होते. यंदा वैयक्तिक प्राप्तिकर संकलनासह कंपनी कर संकलन आणि रोखे व्यवहार कर अर्थात सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (एसटीटी) संकलन वाढवल्याने एकूण कर महसूल वाढला असल्याचे अर्थमंत्रालयाने सांगितले. वैयक्तिक प्राप्तिकर संकलन १० फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध तपशिलानुसार, ११.२८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीपर्यंत ते ९.३० लाख कोटी रुपये होते. कंपन्यांकडून होणाऱ्या कर संकलनात देखील मोठी वाढ झाली आहे. ते १० फेब्रुवारीपर्यंत १०.०८ लाख कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षी या कालावधीत ते ८.७४ लाख कोटी रुपये होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रत्यक्ष कराचा एक महत्त्वाचा घटक असलेला भांडवली बाजरातील रोखे व्यवहार कर अर्थात सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (एसटीटी) या कालावधीत ४९,२०१ कोटी रुपयांवर पोहोचला, जो मागील वर्षी याच कालावधीपर्यंत २९,८०८ कोटी रुपये होता. तर या कालावधीत एकूण ४.१० लाख कोटी रुपयांचे कर परतावे (रिफंड) जारी करण्यात आले, त्यातही वार्षिक तुलनेत ४२.६३ टक्क्यांची वाढ झाली आहे. वाढलेल्या कर संकलनाच्या जोरावर केंद्र सरकारला मोठ्या पायाभूत सुविधा उभारणीसाठी गुंतवणूक आणि कल्याणकारी योजनांसाठी निधी प्राप्त होतो. परिणामी, आर्थिक विकासाला चालना मिळण्यासाठी हा महसुली स्रोत महत्त्वाचा आहे. केंद्र सरकारने पुढील आर्थिक वर्षात वित्तीय तूट सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) ४.४ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट राखले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Direct tax collection increased by 19 percent to rupees 21 88 lakh crores print eco news css