नवी दिल्ली : अग्रणी माहिती-तंत्रज्ञान कंपनी टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसमधील (टीसीएस) नोकरकपात ‘अनैतिक’ आणि ‘पूर्णपणे बेकायदेशीर’ असल्याची तक्रार कर्मचारी संघटनेने केंद्रीय कामगारमंत्री मनसुख मांडवीय यांना पत्र लिहून सोमवारी केली. दरम्यान परिस्थितीवर केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान मंत्रालय बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि टाटा समूहातील प्रमुख कंपनीच्या संपर्कात आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘नॅसंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट (नाइट्स)’ने या सेवा क्षेत्रातील रोजगारासंबंधाने कठोर सुरक्षा उपायांची मागणी या निमित्ताने पुन्हा पटलावर आणली आहे. यापूर्वी इन्फोसिसच्या म्हैसूर संकुलातील ३०० हून अधिक प्रशिक्षणार्थीच्या वतीने तक्रार करणाऱ्या या संघटनेने टीसीएसच्या नवीनतम नोकरकपात योजनेला अनैतिक, अमानवीय आणि पूर्णपणे बेकायदेशीर म्हटले आहे. भ्रामक शब्दच्छल करून होत असलेली ही सामूहिक बडतर्फी आहे, असा संघटनेचा आरोप आहे. याची त्वरित दखल घेऊन टीसीएसकडे स्पष्टीकरण मागविणारी नोटीस बजावण्याचे आवाहन तिने सरकारला केले आहे.

भारताची सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा कंपनी टीसीएसने चालू वर्षभरात एकूण मनुष्यबळाच्या दोन टक्के अर्थात १२,२६१ कर्मचाऱ्यांना कामावर काढून टाकण्याची तयारी सुरू केल्याचे नियोजन दोन दिवसांपूर्वी जाहीर केले. याचा मोठा फटका मध्यम आणि वरिष्ठ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना बसणार आहे. टीसीएसच्या ताज्या निर्णयाला कायद्याचे उघड आणि जाणूनबुजून केलेले उल्लंघन म्हणत, नाइट्सने स्पष्ट केले आहे की, एका वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा केलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्याला कंपनीने एक महिन्याची नोटीस किंवा त्याऐवजी वेतन दिल्याशिवाय, कायदेशीर भरपाई दिल्याशिवाय तसेच सरकारला तसे सूचित केल्याशिवाय काढून टाकता येत नाही, असे कायद्यातच स्पष्टपणे म्हटले आहे.

संपूर्ण कुटुंबाची, वेगवेगळय़ा कारणासाठी घेतलेल्या कर्जाच्या हप्ते आणि अन्य आर्थिक दायीत्वांचा भार वाहत असलेल्या हजारो कार्यरत कर्मचाऱ्यांनी अचानक त्यांची उपजीविका गमावल्याचे किती भयानक परिणाम होतील, याची टीसीएसने दखलच घेतली नसल्याचे नाइट्सचे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा यांनी  पत्रात म्हटले आहे. 

केंद्राकडून दखल, समभागांवर नकारात्मक परिणाम

ताज्या घडामोडीची केंद्रानेही दखल घेतली आहे. केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान मंत्रालय संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि कंपनीशी संपर्कात आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. नोकरकपातीचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त करणाऱ्या मूळ कारणांचा शोध घेतला जाईल, असेही समजते. दरम्यान सोमवारी मुंबई शेअर बाजारात याचे पडसाद उमटले. टाटा समूहातील या बडय़ा कंपनीच्या समभागाचा भाव १.७६ टक्क्यांनी गडगडून ३,०७९.०५ रुपयांवर बंद झाला. नोकरकपातीच्या बातमीने तंत्रज्ञान वर्तुळालाच हादरा दिला असून, सर्वच आयटी समभागांत त्याचे नकारात्मक प्रतिबिंब उमटले.