पीटीआय, नवी दिल्ली
सरलेल्या जून महिन्यात वाहन विक्रीमध्ये वार्षिक आधारावर ५ टक्क्यांची वाढ झाली असून सुमारे २०.०३ लाख वाहने विकली गेली, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन अर्थात ‘फाडा’ने सोमवारी दिली. गेल्यावर्षी म्हणजेच जून २०२४ मध्ये एकूण किरकोळ विक्री १९.११ लाख होती. यंदा प्रवासी वाहने आणि दुचाकींसह सर्व वाहन विभागांमध्ये वाढ दिसून आली आहे .गेल्या महिन्यात एकूण २०.०३ लाख वाहनांची विक्री झाली आहे, जी जून २०२४ मध्ये १९.११ लाख वाहनांच्या तुलनेत ४.८४ टक्क्यांनी वाढली आहे.गेल्या महिन्यात प्रवासी वाहन किरकोळ विक्री २ टक्क्यांनी वाढून २.९७ लाख वाहनांवर पोहोचली, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीत २.९० लाख वाहने होती.
देशभरात बरसणारा मुसळधार पाऊस आणि बाजारपेठेतील तरलतेचा अभाव यामुळे प्रवाशांची गर्दी आणि वाहन खरेदीवर परिणाम झाला आहे. मात्र वितरकांकडील प्रोत्साहन योजना आणि नवीन नोंदणीमुळे वाहन विक्रीला आधार मिळाला, असे ‘फाडा’चे अध्यक्ष सी.एस.विघ्नेश्वर यांनी निवेदनात म्हटले आहे. वितरकांकडील जमा वाहनांच्या (इन्व्हेंटरी) पातळीत लक्षणीय सुधारणा झाली आहे, ती सुमारे पाच दिवसांनी घसरून ५०-५५ दिवसांपर्यंत खाली आली आहे, ज्यामुळे पुरवठा-मागणी संतुलनात सुधारणा झाली आहे.
जूनमध्ये दुचाकी वाहनांच्या किरकोळ विक्रीत ५ टक्क्यांनी वाढ होऊन ती १४.४६ लाख दुचाकींवर पोहोचली आहे. सणोत्सव आणि लग्नाच्या हंगामातील मागणीमुळे वाढ झाली, परंतु वित्तपुरवठ्यातील अडचणी आणि ठरावीक श्रेणीतील वाहनांच्या कमतरतेमुळे विक्री कमी झाली, असे विघ्नेश्वर म्हणाले.
जूनमध्ये वाणिज्य श्रेणीतील वाहनांची नोंदणी ७ टक्क्यांनी वाढून ७३ हजार वाहनांवर पोहोचली आहे. गेल्या महिन्यात तीन चाकी वाहनांची किरकोळ विक्री ७ टक्क्यांनी वाढून १ लाखांवर पोहोचली तर ट्रॅक्टर नोंदणी ९ टक्क्यांनी वाढून ७७ हजारांवर पोहोचली.
एप्रिल-जून या कालावधीत, एकूण किरकोळ विक्री ५ टक्क्यांनी वाढून ६५.४२ लाख वाहनांवर पोहोचली, जी गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीत ६२.३९ लाख वाहनांवर मर्यादित होती. प्रवासी वाहनांची विक्री ३ टक्क्यांनी वाढून ९.७१ लाख वाहनांवर पोहोचली. त्याचप्रमाणे, दुचाकी वाहनांची नोंदणी ५ टक्क्यांनी वाढून ४७.९९ लाख दुचाकींवर पोहोचली आहे.
आगामी काळ आव्हानात्मक आणि सकारात्मकही
नजीकचा काळा व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आव्हानात्मक आहे. कारण चीनमधून आयात होणाऱ्या दुर्मीळ संयुगांच्या अभावामुळे पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. शिवाय वाढता भू-राजकीय तणाव आणि अमेरिकेच्या व्यापारशुल्क धोरणाचा परिणामदेखील कारणीभूत ठरणार आहे. मात्र दुसरीकडे समाधानकारक मान्सूनमुळे शेतीचे उत्पन्न वाढून ग्रामीण मागणीत वाढ होण्याची आशा आहे, यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात दुचाकी वाहनांच्या विक्रीसाठी सकारात्मक संकेत निदर्शनास येत आहेत.