मुंबई: हार्डवेअर इंजिनिअरिंग उद्योगाकडे तरुणींच्या ओढा वाढू लागला असून, गेल्या वर्षी या उद्योगातील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या तरुणींच्या संख्येत २६ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. पुरूषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात आता महिलांची संख्या वाढत असल्याचे सकारात्मक चित्र आहे.

तंत्रज्ञानाधारित मनुष्यबळ सेवा मंच असलेल्या ‘वर्कइंडिया’ने हा अहवाल सोमवारी जाहीर केला. अहवालानुसार, हार्डवेअर इंजिनिअरिंग क्षेत्रात नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या तरूणांच्या संख्येत २०२३ च्या तुलनेत १९ टक्के वाढ झाली. याचवेळी अर्ज करणाऱ्या तरुणींच्या संख्येत २६ टक्के वाढ झाली आहे. ही वाढ केवळ संख्यात्मक नसून, ती वाढत्या कलाचीही निदर्शक आहे. भारतीय तंत्रज्ञान उद्योगातील बदलते चित्र यातून समोर येते. पुरूषांची मक्तेदारी मानल्या जाणाऱ्या या क्षेत्रात आता महिलांचे प्रमाण वाढू लागला आहे. यातून अभियांत्रिकीच्या बदलणारी पुढील दिशा दिसून येत आहे.

तांत्रिक आणि प्राथमिक स्वरूपाच्या आणि तंत्रकुशल स्वरूपाच्या नोकऱ्यांसाठी २०२३ आणि २०२४ मध्ये ‘वर्कइंडिया’च्या मंचावर ३३.४६ लाख अर्ज आले. यात महिलांचे प्रमाण वाढण्यामागे प्रामुख्याने अर्धवेळ कामाच्या प्रकारात झालेली वाढ कारणीभूत ठरली आहे. छोट्या शहरांमध्ये यात वाढ होताना दिसून येत आहे. हार्डवेअर इंजिनिअरिंगशी निगडित रोजगार मात्र मोठ्या शहरांमध्ये वाढत आहेत. या बड्या शहरांतील रोजगारांमध्ये ३० टक्के वाढ झालेली आहे, असे अहवालाने नमूद केले आहे.