मुंबई: सध्या जगावर कृत्रिम प्रज्ञा (आर्टिफिशिय इंटेलिजन्स) अर्थात ‘एआय’ हे नव-तंत्रज्ञान अधिराज्य गाजवत आहे. गुंतवणूकदार विश्वात एनव्हिडिया या अमेरिकी कंपनीची भरधाव तेजी आणि तिने मिळवून दिलेल्या मल्टिबॅगर परताव्याची चर्चा अथकपणे सुरू असून, तिला स्पर्धक ठरणाऱ्या नवनवीन कंपन्या या प्रांगणात प्रवेश करीत आहे. परंतु भारतातील गुंतवणूकदार अशा संधी अभावानेच उपलब्ध असून, ते बव्हंशी या नवीन प्रवाहापासून वंचितच आहेत.
तथापि भारतात पहिलीवहिली एआय कंपनी लवकरच भांडवली बाजारात प्रवेश करू घातली आहे. बाजार नियामक ‘सेबी’कडे तिने बुधवारी ४,९०० कोटी रुपयांच्या प्रस्तावित प्रारंभिक समभाग विक्रीसाठी प्रस्ताव दाखल केला असून, गुंतवणूकदारांनी याची दखल निश्चितच घ्यायला हवी. उल्लेखनीय बाब म्हणजे जागतिक स्तरावर ख्यातकीर्त या भारतीय कंपनीच्या ग्राहकांमध्ये एनव्हिडिया, मायक्रोसॉफ्ट, अॅपल, अल्फाबेट, अमेझॉन, मेटा आणि टेस्ला यासारख्या दिग्गज नावांचा समावेश आहे.
‘एआय’समर्थ उपाय प्रदात्या फ्रॅक्टल ॲनालिटिक्स लिमिटेड ही या क्षेत्रातील पहिली भारतीय कंपनी लवकरच गुंतवणूकदारांच्या उत्कटतेला आजमावणार आहे. कंपनीने प्रारंभिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ) ४,९०० कोटी रुपये उभारण्यासाठी बाजार नियामक ‘सेबी’कडे प्राथमिक प्रस्ताव पत्र दाखल केले आहे. शेअर बाजारात ‘एआय’ अधिक नफा कमावून देईल, असा जगभरातील सध्याचा प्रवाह आता भारतीय गुंतवणूकदारांच्या कसोटीला उतरणार आहे.
मुंबईत मुख्यालय असलेल्या या कंपनीला ३.५ अब्ज अमेरिकी डॉलरपेक्षा अधिक मूल्यांकन मिळू शकेल, असा जाणकारांचा होरा आहे. जर हा आयपीओ आणि त्या पश्चात समभाग सूचिबद्धता यशस्वी ठरली तर ती भारतातील एआय-केंद्रित कंपनीचे ते शेअर बाजारातील पदार्पण ठरेल.
मंगळवारी दाखल करण्यात आलेल्या मसुदा प्रस्तावानुसार, या कंपनीत टीपीजी, अपॅक्स, गजा कॅपिटल, क्विनाग बिडको या बड्या संस्थात्मक गुंतवणूकदारांची हिस्सेदारी आहे. या आयपीओच्या माध्यमातून ते आणि कंपनीतील विद्यमान गुंतवणूकदार त्यांच्या हिस्सेदारीतील ३,६२०.७ कोटी रुपयांचे समभाग विक्रीसाठी खुले करणार आहेत.
फ्रॅक्टलने आयपीओ पूर्व २५५.८ कोटी रुपयांपर्यंतचा निधी उभारण्याचा पर्याय खुला ठेवला आहे. जर तसे झाले तर, प्रत्यक्षात आयपीओचा आकार त्यानुसार कमी केला जाईल.
आयपीओतून मिळणाऱ्या निधीचा वापर हा कर्ज परतफेड करण्यासाठी, भारतात नवीन कार्यालये स्थापन करण्यासाठी, लॅपटॉप खरेदी करण्यासाठी आणि संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी तसेच फ्रॅक्टल यूएसए या उपकंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वापरला जाईल. तसेच, नवीन भांडवल हे कंपनीच्या ‘फ्रॅक्टल अल्फा प्लॅटफॉर्म’चे विपणन तसेच भविष्यातील अधिग्रहणांसाठी वापरले जाईल.
फ्रॅक्टल आहे काय, करते काय?
वर्ष २००० मध्ये श्रीकांत वेलामकन्नी आणि प्रणय अग्रवाल यांनी स्थापित केलेली फ्रॅक्टल विविध क्षेत्रातील मोठ्या बहुराष्ट्रीय ग्राहकांसह सध्या काम करत आहे. आपल्या ग्राहकांना व्यवसायाशी संबंधित निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी डेटा-चालित निरीक्षणे आणि बोध प्रस्तुत करून परिपूर्ण एआय केंद्रीत उपाय कंपनी प्रदान करते.
कंपनीच्या कामकाजाची दोन अंगे आहेत – Fractal.ai, जे प्रामुख्याने त्याच्या Cogentiq प्लॅटफॉर्मवर आधारीत एआय सेवा आणि उत्पादने वितरीत करते आणि Fractal Alpha जे इतर एआय-चालित उपक्रमांचे आगार आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये, फ्रॅक्टलचा महसूल २,७६५ कोटी रुपये झाला, जो मागील आर्थिक वर्षातील २,१९६ कोटी रुपयांपेक्षा २६ टक्क्यांनी जास्त आहे. कंपनीला २२० कोटी रुपयांचा करपश्चात नफा झाला आहे.