गेल्या आठवड्यातील ‘लेखात इलियट वेव्ह संकल्पना’ आणि ‘गॅन कालमापन पद्धत’ (गॅन टाइम सायकल) या दोन महान शास्त्रांच्या अनोख्या मिश्रणातून पुढे आलेले विश्लेषण मांडले होते. गॅन कालमापन पद्धतीत तारखेप्रमाणे ९ ते १३ जूनचा कालावधी, तर इलियट वेव्ह संकल्पनेप्रमाणे निफ्टी निर्देशांक २५,००० ते २५,२०० स्तरावर उच्चांक नोंदवत, घसरणीला सुरुवात होण्याची शक्यता आलेखावर दिसत आहे, असे सुतोवाच गेल्या लेखात केलेले होते. या अनुषंगाने ‘अत्यल्प मुदतीची गुंतवणूक धारणा’ (गुंतवणूक कालावधी तीन महिने) असलेल्या गुंतवणूकदारांनी सावध होऊन नफारूपी विक्री करणे श्रेयस्कर. हे गेल्या लेखातील वाक्य अगदी चपखल लागूही पडले.

काळाच्या कसोटीवर तपासता ११ जूनला निफ्टी निर्देशांकाने २५,२२२ चा उच्चांक नोंदवला. तर सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारच्या सत्रात निफ्टी निर्देशांक २४,४७३ पर्यंत घसरला. अर्थात निफ्टी निर्देशांकाने २४,५०० चे खालचे लक्ष्यदेखील साध्य केले. अशा रीतीने निफ्टीने आपले २५,२००चे संख्यात्मक (प्राइस वाईज) वरचे लक्ष्य अचूक कालावधीत (९ ते १३ जून दरम्यान) साध्य करत, तांत्रिक विश्लेषणातील सोनेरी नियमाच्या लकाकीला आणखी तेज मिळवून दिले. ‘‘निर्देशांकाचे /समभागाचे वरचे अथवा खालचे नमूद केलेले लक्ष्य हे दिलेल्या वेळेनुसार आणि किमतीच्या स्वरूपात साध्य झाले पाहिजे.” सरलेल्या सप्ताहात वरील सोनेरी नियम निफ्टी निर्देशांकाच्या बाबतीत तर प्रत्यक्षात आलाच, पण त्याच बरोबर ‘कालाय तस्मै नमः’ या आध्यात्मिक सुभाषिताचा साक्षात्कार आर्थिक जगताला सरलेल्या सप्ताहात बघायला मिळाला.

आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकाला २४,५००चा भरभक्कम आधार आहे. या स्तरावरून निफ्टी निर्देशांकावर २४,७७५ ते २४,९५०पर्यंत सुधारणा संभवते. निफ्टी निर्देशांक सातत्याने २५,०५०च्या स्तरावर पंधरा दिवस टिकल्यास निफ्टी निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य हे २५,२०० ते २५,५०० असेल. द्वितीय वरचे लक्ष्य २५,८०० असेल. निफ्टी निर्देशांक २४,५००चा भरभक्कम आधार राखण्यास अपयशी ठरल्यास निफ्टी निर्देशांकाचे प्रथम खालील लक्ष्य २४,२०० ते २४,०००, द्वितीय खालचे लक्ष्य २३,८०० ते २३,५०० असेल.

चिकित्सा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर संकल्पनेची

मे महिन्यातील भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळेला हिंदुस्थान एरोनॉटिक्स, भारत डायनॅमिक्स, माझगाव डॉक, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, पारस डिफेन्स या संरक्षण क्षेत्रातील कंपन्या सर्वतोमुखी होत्या. यातील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) या समभागाचे ‘निकालपूर्व विश्लेषण’ करायची संधी या स्तंभात १९ मे २०२५ रोजी मिळाली होती. त्या समयी शुक्रवार, १६ मे रोजी समभागाचा बंद भाव ३६४ रुपये होता, तर वित्तीय निकाल १९ मेला जाहीर होणार होते. निकालानंतरचा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ हा ३५५ रुपये होता. समभागाचा निकाल उत्कृष्ट असल्यास, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ३५५ रुपयांचा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ राखत ४०० रुपयांचे वरचे लक्ष्य साध्य करेल, असे नमूद केलेले. प्रत्यक्ष निकालानंतर समभाग ३५५ रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखत होता.

पण ४०० रुपयांचे वरचे लक्ष्य गाठेल की नाही याची घालमेल सुरू होती. कारण तेजीच्या धारणेला कलाटणी मिळणारी तारीख ही ९ ते १३ जून तर निफ्टी निर्देशांक २५,२००च्या टिपेला, पण भारत इलेक्ट्रॉनिक्सचा बाजारभाव जूनच्या पूर्वार्धात ३९० रुपयांवरच घुटमळतोय. ४०० रुपयांचे वरचे लक्ष्य हाकेच्या अंतरावर पण साध्य होत नव्हतं. आता अचूक लक्ष्यवेधासाठी ‘ब्रह्मोस क्षेपणास्त्र’ काढायची वेळ आलेली, तसे १० जूनला ब्रह्मोस क्षेपणास्त्र काढले गेले. ४०० रुपयांचे वरचे लक्ष्य हे ४०१ रुपयांचा उच्चांक मारत अचूक साधले गेले. या कालावधीत अल्पमुदतीच्या गुंतवणूकदारांना ९ टक्क्यांचा परतावा मिळाला. शुक्रवार १३ जूनचा समभागाचा बंद भाव ३९४ रुपये आहे. आशीष ठाकूर लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत. ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणी ‘इच्छित लक्ष्य’ या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक.