मुंबई : आपल्या भागधारकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा, त्यांना खूष ठेवण्याचा कंपन्याकडून वापरला जाणारा लोकप्रिय मार्ग म्हणजे बोनस शेअर अर्थात बक्षीस समभाग होय. सिगारेट उत्पादक गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेडच्या संचालक मंडळाची येत्या ४ ऑगस्ट रोजी बैठक पार पडणार  आहे. या बैठकीत भागधारकांना बक्षीस (बोनस) समभाग देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. याबरोबरच जून अखेर सरलेल्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर होणार आहेत.

कंपनीकडून विद्यमान भागधारकांना २:१ या प्रमाणात बक्षीस समभाग दिले जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच विद्यमनधारकांकडे एक समभाग असेल त्यांना दोन रुपये दर्शनी मूल्य असलेले दोन समभाग बक्षीसरूपात विनामूल्य प्राप्त होतील.

संचालक मंडळाने बक्षीस (बोनस) योजनेला मंजुरी दिल्यानंतर रेकॉर्ड तारखेबाबत तपशील जाहीर केला जाईल. या बोनस शेअरसाठी भागधारकांचीही मान्यता आवश्यक असेल. बोनस शेअर म्हणजे पात्र भागधारकांना विनामूल्य शेअर वितरण केले जाते. 

जबरदस्त डिव्हिडंड

गेल्या वर्षी, गॉडफ्रे फिलिप्स इंडियाने प्रति शेअर ३५ रुपये अंतरिम लाभांश आणि ५६ रुपये अंतिम लाभांश दिला. लाभांशाव्यतिरिक्त, कंपनीने २०१४ मध्ये शेवटचे शेअर विभाजन (स्टॉक स्प्लिट) केले होते. विद्यमान भागधारकांना मूल्यवृद्धीचा फायदा मिळवून देण्यासह भांडवली बाजारात कंपनीच्या समभागांची तरलता वाढवणे हे या निर्णयामागे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

मुंबई शेअर बाजारात गॉडफ्रे फिलिप्स इंडियाचा समभाग मंगळवारच्या सत्रात प्रत्येकी ४०.५० रुपयांनी वाढून ८,७३५ रुपयांवर बंद झाला. गत वर्षभरात शेअरने तब्बल १०४ टक्के परतावा दिला आहे. सध्याच्या शेअरच्या बाजार भावानुसार कंपनीचे ४५,३४९ कोटी रुपयांचे बाजार भांडवल आहे.