पीटीआय, नवी दिल्ली : हिंदुजा समूहाचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी लंडनमध्ये निधन झाले. उद्योग वर्तुळात ते ‘जीपी’ म्हणून ओळखले जात. ते गेल्या काही आठवड्यांपासून आजारी होते आणि मंगळवारी लंडनच्या रुग्णालयात त्यांचे निधन झाले.

चार हिंदुजा बंधूंपैकी सर्वात मोठे श्रीचंद हिंदुजा यांचे २०२३ मध्ये निधन झाले. त्यानंतर हिंदुजा कुटुंबातील दुसरे ज्येष्ठ या नात्याने गोपीचंद यांनी मे २०२३ मध्ये अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांच्या पश्चात पत्नी सुनीता, मुले संजय आणि धीरज आणि मुलगी रिटा असा परिवार आहे.
मुंबईतील जय हिंद महाविद्यालयातून पदवीधर असलेले गोपीचंद यांनी वेस्टमिन्स्टर विद्यापीठ आणि रिचमंड कॉलेजमधून मानद डॉक्टरेट पदवी मिळविली.

हिंदुजा समूहाचा वाहन निर्मिती, बँकिंग आणि वित्त, आयटी, आरोग्यसेवा, स्थावर मालमत्ता, वीज तसेच माध्यम व मनोरंजन यासह ११ क्षेत्रांमध्ये व्यवसाय कार्यरत आहेत. अशोक लेलँड, इंडसइंड बँक आणि एनएक्सटी डिजिटल लिमिटेड यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा त्यांचा समूहात समावेश आहे.

वृत्तसंस्थेनुसार, २०२५ च्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीनुसार, गोपीचंद हिंदुजा यांचे कुटुंब ३२.३ अब्ज पौंडांच्या संपत्तीसह ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणून घोषित करण्यात आले आहे. वर्ष २०२१ मध्ये लंडनमधील एका न्यायालयात पोहोचलेल्या वादामुळे हिंदुजा कुटुंब बातम्यांमध्ये चर्चेत राहिले.

श्रीचंद हिंदुजा यांची मुलगी विनू आणि शानू यांनी त्यांच्या तीन काकांवर निधी आणि निर्णय घेण्यापासून त्यांना रोखल्याचा आरोप केला. त्यावेळी ‘एसपी’ म्हणून ओळखले जाणारे श्रीचंद हिंदुजा हे स्मृतिभ्रंश (डिमेंशिया) या आजाराने ग्रस्त होते. आरोपांना उत्तर देताना, गोपीचंद, प्रकाश आणि अशोक यांनी २०१३ मध्ये चारही भावांनी केलेल्या कराराचा उल्लेख केला. ‘सर्व काही सर्वांचे आहे आणि काहीही कोणाचे नाही,’ असा तो करार होता. तरी या प्रकरणातून कुटुंबातील कलह जगजाहीर झाला होता.