पीटीआय, नवी दिल्ली
नैसर्गिक वायू आणि खनिज तेलाच्या उत्पादनात घट झाल्यामुळे सरलेल्या जुलै महिन्यात आठ प्रमुख पायाभूत क्षेत्रांच्या उत्पादनातील वाढ ६.१ टक्क्यांवर मर्यादित राहिली. त्या आधीच्या जून महिन्यात वाढीचा दर ५.१ टक्के राहिला होता. तर कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, इंधन शुद्धीकरण उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि वीज या प्रमुख क्षेत्रांची वाढ जुलै २०२३ मध्ये ८.५ टक्के होती.
हेही वाचा : राजस्थान सरकारचे मुंबईत ४ लाख कोटी गुंतवणुकीचे करार
या आर्थिक वर्षात एप्रिल-जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत मुख्य क्षेत्रांचे उत्पादन ६.१ टक्के नोंदवले गेले आहे. जे गेल्यावर्षी याच कालावधीत ६.६ टक्के होते. सरलेल्या जुलै महिन्यात खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन अनुक्रमे (-) २.९ टक्के आणि (-) १.३ टक्क्यांपर्यत घसरले आहे. त्याबरोबरच कोळसा, पोलाद, सिमेंट आणि वीज उत्पादनातील वाढीचा दर अनुक्रमे ६.८ टक्के, ७.२ टक्के, ५.५ टक्के आणि ७ टक्के आहे. मात्र इंधन शुद्धीकरण उत्पादने आणि खतांची उत्पादनात अनुक्रमे ६.६ टक्के आणि ५.३ टक्के वाढ झाली आहे.