नवी दिल्ली : वस्तू व सेवा करातील (जीएसटी) कपातीचा पूर्ण फायदा उद्योगांनी ग्राहकापर्यंत पोहोचवावा. यामुळे देशांतर्गत उत्पादनांची मागणी वाढेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम होईल, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी सोमवारी केले.
गोयल म्हणाले की, जीएसटी दरामध्ये कपातीसोबत त्याचे सुलभीकरणही झाले आहे. यामुळे देशांतर्गत मागणी वाढून याचा फायदा छोट्या तसेच मोठ्या उद्योगांना होणार आहे. यातून नवीन व्यवसाय संधी, रोजगार निर्मिती, उत्पन्नात वाढ आणि क्रयशक्तीतील वाढ आदी गोष्टी घडतील. या सर्व गोष्टींमुळे देशातील आर्थिक चक्राला चालना मिळून होऊन विकासालाही गती मिळेल. भारत हा जागतिक महासत्ता बनणार असून, कोणीही आपल्याला त्यापासून रोखू शकणार नाही.
उद्योगांनी जीएसटीतील कपातीचा पूर्ण फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवावा. प्रत्येक नागरिकांपर्यंत हे विकासाचे वारे पोहोचेल आणि त्यातून देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम होईल. देशातील उद्योगांनी एकत्रित कुटुंबातील सदस्य असल्याप्रमाणे काम करण्याची आवश्यकता आहे. एका उद्योगाने दुसऱ्या उद्योगाला मदत केल्यास त्यातून सर्वंकष प्रगती साध्य होणार आहे. शाश्वत आणि सर्वांगीण विकासाचे भारत हे जगातील आदर्श उदाहरण ठरेल, असेही गोयल यांनी नमूद केले.
देशाची अर्थव्यवस्था सध्या ४ लाख कोटी डॉलरवर पोहोचली आहे. भारत ही पुढील अडीच ते तीन वर्षात जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. आपली अर्थव्यवस्था २०४७ पर्यंत सुमारे ३० लाख कोटी डॉलरवर पोहोचेल. – पियूष गोयल, केंद्रीय वाणिज्य मंत्री