मुंबईः देशाच्या छोट्या शहरांमधून नव-गुंतवणूकदारांचा प्रवाह सध्या म्युच्युअल फंड, शेअर्स अशा संपत्ती निर्माणाच्या साधनांमध्ये मोठ्या गतीने गेल्या काही काळात सुरू आहे. या नवीन गुंतवणूकदारांना, सूज्ञतेने निर्णय घेण्यासाठी त्यांच्या सक्षमतेत आणि पर्यायाने त्यांच्या सहभागात वाढीसाठी भाषा ही अडसर ठरू नये, असा उद्देशाने देशातील खासगी क्षेत्रातील अग्रणी एचडीएफसी बँकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

म्युच्युअल फंड गुंतवणुका, बँक ठेवी, डिमॅट खाते अर्थात शेअर गुंतवणूक आणि बाँड / रोखे गुंतवणूक असे सारे एकाच ठिकाणी व्यवस्थापित करण्याची गुंतवणूकदारांना सोय मिळवून देणारे डिजिटल व्यासपीठ अर्थात एचडीएफसी बँकेचे स्मार्टवेल्थ हे मोबाईल ॲप प्रचलित आहे. त्यात आता समावेश करण्यात आलेल्या नवीनतम वैशिष्ट्यामुळे त्यानेे ग्राहकांचा गुंतवणुकीचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक समावेशक, सुलभ आणि वैयक्तिकीकृत बनविला आहे.

हे ॲप आता नऊ भारतीय भाषांमधून वापरता येईल. ज्यामध्ये इंग्रजीसह, मराठी, हिंदी, गुजराती, पंजाबी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि बंगाली या भाषांचा समावेश आहे. वापरकर्त्यांना गुंतवणूक करण्याची, त्यांच्या पोर्टफोलिओच्या कामगिरीचा नियमित मागोवा घेत, तो व्यवस्थापित करण्याची आणि वैयक्तिक महत्त्वाची आर्थिक माहिती त्यांच्या पसंतीच्या भाषेत विनाविलंब मिळविण्याचा सोयीस्कर मार्ग यामुळे खुला झाला आहे. या नवीन प्रस्तुतीमुळे स्मार्टवेल्थ हे भारतातील प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध परिपूर्ण वैशिष्ट्यांचा समावेश असलेला पहिला गुंतवणुकीचे डिजिटल व्यासपीठ बनले आहे.

वापरकर्ते ॲपमधील ‘अधिक’ विभागाद्वारे कधीही त्यांची पसंतीची भाषा बदलून सेवा मिळवू शकतात. अर्थात वापरकर्त्यांच्या सोयीची परिपूर्ण काळजी घेण्यात आली आहे. हा नवीन वैशिष्ट्यपूर्ण बदल गुंतवणूक आणि संपत्ती व्यवस्थापन सेवा अधिक वैयक्तिक, माहितीपूर्ण आणि सूज्ञ बनवण्यासाठी करण्यात आला आहे, यामागे गुंतवणुकीच्या सार्वत्रिकीकरणाचाही उद्देश आहे, असे बँकेने म्हटले आहे.

“आता, तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाषेत तुमची गुंतवणूक व्यवस्थापित करू शकता. तुमचे आर्थिक स्वातंत्र्य हे तुमच्या गुंतवणूक निर्णयाला समजून घेण्यापासून सुरू व्हायला हवे,” असे बँकेने या संबंधाने निवेदनात म्हटले आहे.

स्मार्टवेल्थ मोबाईल ॲप हे एकाच ठिकाणी म्युच्युअल फंड, मुदत ठेवी आणि डिमॅट खात्यातील शेअर्सची धारणा आदी सर्व एका नजरेत वापरकर्त्यांपुढे प्रस्तुत करते. आता हे ॲप बहुभाषिक बनले असल्याने गुंतवणुकीच्या लोकशाहीकरणासाठी एचडीएफसी बँकेच्या प्रयत्न आणि वचनबद्धतेला बळकटी मिळाली आहे. अधिक व्यापक आणि वैविध्यपूर्ण ग्राहकवर्गाला तिच्या सेवांचे दालन आता यातून खुले होईल.

या नवीन सुविधेचा बँकेचे रिलेशनशिप मॅनेजर्स आणि शाखा कर्मचाऱ्यांनाही फायदा होईल, ज्यामुळे नवीन वापरकर्त्यांना त्यांना समजणाऱ्या भाषेत अपेक्षित माहिती पोहचविण्याबरोबरच, भाषेच्या अंतरांशिवाय ॲपची वैशिष्ट्ये समजावून सांगणे सोपे होईल.