ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील आघाडीची कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हरने भागधारकांच्या पदरी भरभरून लाभ दिला आहे. सरलेल्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीने प्रतिसमभाग १९ रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. परिणामी कंपनीच्या सुमारे २३४.९५ कोटी भागधारकांना ४,४६४.२३ कोटी रुपये लाभांश मिळणार आहे.कंपनीच्या भागधारकांमध्ये १०.५३ लाखांहून अधिक लहान गुंतवणूकदारांचा समावेश आहे, त्यांना ४४६.७० कोटी रुपये लाभांश म्हणून मिळणार आहे.
या १०.५३ लाखांहून अधिक लहान गुंतवणूकदारांकडे २३.५१ कोटी समभाग आहेत. तर मोठी भागधारक असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीकडे हिंदुस्तान युनिलिव्हरची ६.४९ टक्के हिस्सेदारी म्हणजेच सुमारे १५.२६ कोटी समभागांची मालकी आहे. यामुळे एलआयसीला २८९.९५ कोटी रुपये लाभांश म्हणून मिळतील. तर देशांतर्गत म्युच्युअल फंडांकडे १५.०२ कोटी समभाग आहेत, त्यांना यातून २८५.४५ कोटी रुपये लाभांश मिळणार आहे.
कंपनीने लाभांश मिळवण्यासाठी पात्रता निश्चित करण्यासाठी ७ नोव्हेंबर रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे आणि लाभांश २० नोव्हेंबरला भागधारकांना देण्यात येईल.कंपनीने सरलेल्या सप्टेंबर तिमाहीत २,६९४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. त्यात वार्षिक आधारावर ३.६ टक्क्यांची वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत, एचयूएलचे एकूण उत्पन्न ३ टक्क्यांनी वाढून ३३,१०३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मुंबई शेअर बाजारात एचयूएलचा समभाग ९.९० रुपयांनी वधारून २६०१.६० रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार, ६.११ लाख कोटींचे बाजारभांडवल आहे.
