लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

पुणे : इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मिती क्षेत्रातील आयगो कंपनीने पुणेस्थित सन इलेक्ट्रो डिव्हाइसेस या कंपनीशी उत्पादन भागीदारी केली आहे. या भागीदारीच्या माध्यमातून आयगोच्या अत्याधुनिक २.५ चाकी स्मार्ट ई-वाहनांच्या उत्पादनाला गती मिळणार आहे.

सन इलेक्ट्रो डिव्हाइसेसचा चाकणमध्ये उत्पादन प्रकल्प आहे. कंपनीला वाहन निर्मितीमध्ये अनेक दशकांचा अनुभव आहे. आता या प्रकल्पातून आयगोच्या २.५ चाकी वाहनांचे उत्पादन होणार आहे. पारंपरिक स्कूटर आणि तीन चाकी मालवाहू रिक्षा यांच्यात मध्य साधणारी ही नवीन २.५ चाकी वाहन श्रेणी आयगोने विकसित केली आहे.

याबाबत आयगोचे मुख्याधिकारी श्रावण अप्पना म्हणाले की, नवीन तंत्रज्ञान आणि हार्डवेअर बांधणी करणे जिकिरीचे असते. त्यातून चांगले उत्पादन तयार करणे अवघड असते. त्यातही त्याला प्रमाणीकरण मिळविणे आव्हानात्मक असते. या सर्व गोष्टींची सांगड घालून आम्ही उत्पादन प्रक्रिया सन इलेक्ट्रो डिव्हाईसेसवर सोपवली आहे.

चाकणमधील प्रकल्पातून दरमहा एक हजार वाहनांची निर्मिती होईल. यातून पुणे, पणजी आणि मुंबईत कंपनी विस्तार करणार आहे. आयगोच्या २.५ चाकी ई-वाहनांमध्ये संतुलन, स्थिरता तंत्रज्ञान, स्वयंसंतुलन आणि तीनचाकी सीबीएस यंत्रणा अशी वैशिष्ट्ये आहेत. पारंपरिक स्कूटर आणि तीन चाकी मालवाहू रिक्षा यांच्यात मध्य साधणारी ही नवीन वाहन श्रेणी कंपनीने विकसित केली आहे.