पीटीआय, नवी दिल्ली
जागतिक पातळीवर अर्थव्यवस्थेत घसरणीचे वारे सुरू असूनही आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये २३८ पैकी ११५ देशांमध्ये भारताचा निर्यात व्यापारात वाढला आहे. देशाच्या एकूण निर्यातीत या ११५ देशांचा वाटा ४६.५ टक्के असल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीने स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात भारताची निर्यात ११५ देशांमध्ये वाढली आहे. त्यात अमेरिका, संयुक्त अरब अमिराती, चीन, ब्रिटन, सौदी अरब, सिंगापूर, बांगलादेश, जर्मनी आणि इटली या प्रमुख देशांचा समावेश आहे. भारताची एकूण निर्यात (वस्तू आणि सेवा मिळून) गेल्या आर्थिक वर्षात उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. जागतिक पातळीवर आव्हाने असूनही निर्यात ७७८.२ अब्ज डॉलरवर पोहोचली. आधीच्या वर्षात ती ७७६.४ अब्ज डॉलर होती. त्यात गेल्या वर्षी किरकोळ ०.२३ टक्के वाढ नोंदविण्यात आली.

हेही वाचा >>>Gold-Silver Price on 9 May 2024: सोन्याच्या भावात वाढ झाल्यानंतर आता घसरण, १० ग्रॅमचा दर ऐकून चेहरा उजळेल!

भारताची एकूण निर्यात वाढली असली तरी वस्तू निर्यात मात्र घटली आहे. गेल्या आर्थिक वर्षात वस्तू निर्यातीत तीन टक्क्यांची घट होऊन ४३७.१ अब्ज डॉलर नोंदवली गेली आहे. याचवेळी सेवांची निर्यात ३४१.१ अब्ज डॉलर झाली, जी आधीच्या वर्षात ३२५.३ अब्ज डॉलर होती. एकूण जागतिक निर्यातीत भारताच्या वस्तू निर्यातीचे प्रमाण १.८२ टक्क्यांवर पोहोचले आहे. हे प्रमाण २०१४ मध्ये १.७० टक्के होते. जागतिक वस्तू निर्यात क्रमवारीत भारत १९ व्या स्थानावरून आता १७ व्या स्थानावर पोहोचला आहे, असे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in india exports to 115 countries worldwide print eco news amy