मुंबई : खासगी क्षेत्रातील इंडसइंड बँकेच्या ‘डेरिव्हेटिव्ह’ सौद्यांशी संबंधित व्यवहारांतील शिलकीत तफावत आढळून आल्याचे उघड झाले. ज्यावर विश्लेषकांनी व्यक्त केलेल्या चिंता आणि अस्वस्थ गुंतवणूकदारांकडून झालेल्या विक्रीतून समभाग मंगळवारी तब्बल २७ टक्क्यांनी आपटला. करोना काळातील मार्च २०२० मधील पडझडीच्या समकक्ष, बँकेच्या समभागांत झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंगळवारच्या सत्रात इंडसइंड बँकेचा समभाग २७.१६ म्हणजेच २४४.५५ रुपयांनी गडगडून ६५५.९५ रुपयांवर बंद झाला. समभागाने ५२ आठवड्यातील नीचांकी पातळी गाठली आहे. या आधी चालू वर्षात आतापर्यंत तो त्याच्या उच्चांक स्तरावरून ४७ टक्क्यांनी घसरला आहे. विश्लेषकांनी, बँकेच्या संभाव्य कमाईला फटका बसण्याचा इशारा दिल्याने आणि कमकुवत अंतर्गत नियंत्रणांबद्दल चिंता व्यक्त केल्याने, समभागाला मोठा फटका बसला आहे. परिणामी बँकेचा समभागाने मंगळवारच्या सत्रात ‘लोअर सर्किट’ अर्थात दिवसांतर्गत कमाल नीचतम पातळी गाठली.

इंडसइंड बँकेने अंतर्गत पुनरावलोकनातून तिच्या डेरिव्हेटिव्हज सौद्यांमध्ये हिशेबात तफावत नोंदवल्याचा शुक्रवारी स्वतःहून उलगडा केला. बँकेने गत काळातील विदेशी चलनांतील ठेवी व कर्ज व्यवहारांशी संबंधित हेजिंग खर्च कमी लेखला होता. बँकेच्या खुलाशामुळे बँकेला तिच्या निव्वळ संपत्तीला १,६००-२,१०० कोटी रुपयांचा संभाव्य फटका बसू शकेल. मात्र बँकेचा नफा आणि भांडवल पर्याप्तता प्रमाण निरोगी पातळीवर आहे, असे इंडसइंड बँकेने स्पष्ट केले.

म्युच्युअल फंड घराण्यांना फटका

‘एस इक्विटीज’च्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२५ पर्यंत ३५ म्युच्युअल फंडांनी एकत्रितपणे इंडसइंड बँकेचे २०.८८ कोटींहून अधिक समभाग पोर्टफोलिओमध्ये धारण केले आहेत. ज्याचे मूल्य २०,६७० कोटी रुपये होते. मात्र अलीकडील समभागातील घसरणीनंतर त्यांचे मूल्य आता १३,७७० कोटी रुपयांपर्यंत घसरले आहे. म्हणजेच म्युच्युअल फंड घराण्यांकडील इंडसइंड बँकेच्या समभागांचे मूल्य गेल्या काही सत्रात ६,९०० कोटी रुपयांनी घटले आहे. समभागात घसरणीने बँकेच्या बाजार भांडवलात काही सत्रांमध्ये एकंदर १८,००० कोटींची घसरण झाली आहे.

गरज भासल्यास भांडवल भरणा – हिंदुजा

इंडसइंड बँकेचे प्रवर्तक अशोक हिंदुजा यांनी भांडवलाची आवश्यकता उद्भवल्यास त्याची पूर्तता केली जाईल, अशी ग्वाही दिली. बँकेची आर्थिक स्थिती चांगली असल्याचेही ते म्हणाले. बँकेच्या भागधारकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. सध्या उद्भवलेली ही सामान्य समस्या असून, बँकेने स्वतःहून तिचा उलगडा करणे म्हणजेच तिने दाखवलेल्या पारदर्शकतेचे बाजाराने खरे तर कौतुक करायला हवे. बँकिंग व्यवसाय सचोटी आणि विश्वासावर आधारित असतो. प्रवर्तक गटाचा बँकेच्या संचालक मंडळ आणि व्यवस्थापनावर दृढ विश्वास असल्याचेही हिंदुजा म्हणाले.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indusind bank shares crash 27 percent print eco news css