देशातील आघाडीची माहिती-तंत्रज्ञान कंपनी असलेल्या इन्फोसिसकडून विद्यमान आर्थिक वर्षात २०,००० नवीन पदवीधरांना नोकरी दिली जाणार आहे. सरलेल्या जून तिमाहीत कंपनीने २१० कर्मचाऱ्यांची नव्याने भरती केली असून ज्यामुळे कर्मचारी संख्या ३२३,७८८ वर पोहोचली आहे. वार्षिक आधारावर कर्मचाऱ्यांच्या संख्येत २.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सरलेल्या जून तिमाहीत कंपनीने निव्वळ नफ्यात ८.७ टक्के वाढ नोंदवली आहे. कंपनीचा नफा ६,९२१ कोटी रुपयांवर पोहोचला असून गेल्या वर्षी याच कालावधीत तो ६,३६८ कोटी रुपये होता. मात्र कंपनीने अपेक्षेपेक्षा अधिक नोंदवलेल्या नफ्यानंतर पूर्ण वर्षाच्या महसुलाचा अंदाज कमी केला आहे. इन्फोसिसने त्यांचा वार्षिक महसूल वाढीचा अंदाज मागील ० ते ३ टक्क्यांच्या श्रेणीवरून १ टक्के ते ३ टक्के इतका कमी केला.
कृत्रिम प्रज्ञेतील (एआय) चांगल्या कामगिरीमुळे कंपनीचा महसूल ४२,२७९ कोटी रुपयांवर पोहोचला, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत ७.५३ टक्के आणि तिमाही-दर आधारवर ३.३ टक्के अधिक आहे. जानेवारी-मार्च तिमाहीच्या तुलनेत निव्वळ नफा अनुक्रमे १.५ टक्क्यांनी कमी झाला आहे.
पहिल्या तिमाहीतील कंपनीची कामगिरी ही एंटरप्राइझ एआय क्षमतांची ताकद दर्शवते. तसेच ३००,००० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या समर्पणाचे ते फळ आहे. कंपनीने ३.८ अब्ज डॉलरचे कार्यादेश प्राप्त केले असून जे मजबूत ग्राहक संबंध दर्शवतात, असे इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सलील पारेख म्हणाले.
वित्तीय सेवा हे सर्वात मोठे क्षेत्र राहिले, ज्याने आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत एकूण महसुलात सुमारे २७.९ टक्के योगदान दिले, त्यानंतर उत्पादन १६.१ टक्के आणि किरकोळ विक्री १३.४ टक्के होती. भौगोलिकदृष्ट्या, उत्तर अमेरिकेचा तिमाही महसुलात ५६.५ टक्के वाटा होता, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीतील ५८.९ टक्क्यांवरून कमी आहे. युरोपने आपला वाटा विद्यमान आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत २८.४ टक्क्यांवरून ३१.५ टक्क्यांपर्यंत वाढवला.
गेल्या अनेक तिमाहींपासून युरोपाचा कंपनीच्या महसुलात महत्त्वाचे योगदान राहिले आहे. काही वर्षांपूर्वी युरोपमध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे हे शक्य झाले आहे, असे इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी जयेश संघराजका म्हणाले.