मुंबई: विविधांगी उद्योग क्षेत्रात वावर आणि दोन किंवा अधिक सूचीबद्ध कंपन्या असणारी उद्योग घराणी भारतात अनेक आहेत. नामांकित नाममुद्रा, मजबूत प्रवर्तक आणि नेटक्या व वैविध्यपूर्ण कारभाराच्या पाठबळाने हे उद्योग समूह कोणतीही मंदीसदृश स्थिती आणि धक्क्यांना पचवून घेत, उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये विस्तार तसेच उद्योगांतील नवनवीन संधी हेरण्यासाठी चांगल्या स्थितीत असतात. अशा नामवंत उद्योग समूहातील कंपन्यांत आंशिक मालकीची संधी सामान्य गुंतवणूकदारांना खुली झाली आहे.
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने नवीन समभागसंलग्न (इक्विटी) योजना ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल काँग्लोमेरेट फंड’ या नावाने प्रस्तुत केली आहे. या नवीन योजनेचा प्रस्ताव अर्थात ‘एनएफओ’ शुक्रवार, ३ ऑक्टोबरपासून, १७ ऑक्टोबर २०२५ या दरम्यान सुरू असेल.
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल काँग्लोमेरेट फंडाच्या गुंतवणूक विश्वात ७१ उद्योग समूह असून, ज्यांच्या अनेक क्षेत्रांमधील आणि वेगवेगळे बाजार भांडवल असलेल्या अंदाजे २४० कंपन्या समाविष्ट आहेत. या योजनेचे निधी व्यवस्थापन ललित कुमार हे करणार आहेत. योजनेच्या कामगिरीसाठी मानदंड निर्देशांक म्हणून ‘बीएसई सिलेक्ट बिझनेस ग्रुप्स इंडेक्स’ निश्चित करण्यात आला आहे. एनएफओ दरम्यान किमान अर्ज रक्कम १,००० रुपये आहे.
योजनेच्या अनावरणप्रसंगी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीचे कार्यकारी संचालक आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी शंकरन नरेन म्हणाले, ‘भारतातील आघाडीच्या उद्योग समूहांनी दशकांपासून नवनवी वाट चोखाळत उल्लेखनीय क्षमता दाखवली आहे. संघटित किराणा क्षेत्र ते दूरसंचार असो किंवा अक्षय्य ऊर्जा आणि सेमीकंडक्टरसारखी भविष्यवेधी संक्रमण दर्शविणाऱ्या क्षेत्रात ते प्रवेश करत आहेत. तेथेही सुयोग्य दृष्टिकोन आणि कणखरतेसह त्यांचा प्रवास ताकदीने सुरू आहे.
या योजनेद्वारे भारताच्या विकासगाथेचे पाईक ठरलेल्या या उद्योग समूहांमध्ये प्रवेशाची गुंतवणूकदारांना संधी देण्याचे उद्दिष्ट आहे.’ मजबूत ताळेबंद, भांडवलाचा कमी खर्च, तसेच खर्च कार्यक्षमता आणि प्रतिभा टिकवून ठेवण्याची सक्षमता, रोखप्रवाहाचे विविधांगी स्रोत आणि उदयोन्मुख क्षेत्रांत विस्तार ही बड्या उद्योग घराण्यांची अविभक्त वैशिष्ट्ये आहेत.
आकडेवारी दर्शविते की, ‘निफ्टी १००’ निर्देशांकामध्ये उद्योग घराण्यांचा वाटा वाढत आहे, जो भारताच्या उद्यमविश्वात त्यांचे वाढते प्रस्थ दर्शवितो. आजच्या जागतिक आणि स्थानिक अनिश्चित वातावरणात, बडे उद्योग समूह हे केवळ भांडवलाचे रक्षण करण्यासाठीच नव्हे, तर दीर्घकालीन संपत्ती निर्मितीच्या संधीसाठी देखील चांगल्या स्थितीत आहेत.