मुंबई: भारतातील तिसरी सर्वात मोठी स्टील वायर उत्पादक कंपनी (‘केअर एज’ अहवालानुसार) सिस्टेमॅटिक इंडस्ट्रीज लिमिटेडने मंगळवार, २४ सप्टेंबर ते शुक्रवार, २६ सप्टेंबर या दरम्यान प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) प्रस्तावित केली आहे. प्रति समभाग १८५ रुपये ते १९५ रुपये असा किंमतपट्टा यासाठी कंपनीने निश्चित केला आहे. मार्च २००० मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीने गेल्या २५ हून अधिक वर्षांपासून वीजनिर्मती व पारेषण, पायाभूत सुविधा, शेती, दूरसंचार तसेच इतर क्षेत्रांना तिची उत्पादने पुरविली आहेत. प्रस्तावित आयपीओच्या माध्यमातून ५९.२८ लाख नवीन समभाग जारी करून, कंपनी ११५.६० कोटी रुपये उभारणार आहे. हा निधी कंपनीने घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी वापरात येणार आहे. हेम सिक्युरिटीज लिमिटेड या आयपीओची प्रधान व्यवस्थापक, तर निबंधक म्हणून कॅमिओ कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी काम पाहणार आहे.

आयपीओपश्चात सिस्टेमॅटिक इंडस्ट्रीजचे समभाग ‘बीएसई एसएमई’ बाजारमंचावर सूचिबद्ध होणार असून, याची संभाव्य तारीख १ ऑक्टोबर २०२५ असेल. वैयक्तिक गुंतवणूकदारांना किमान १,२०० समभागांसाठी अर्ज करून अर्थात किमान २.३४ लाख रुपये गुंतवणूक करून या समभागांसाठी बोली लावता येईल.

कंपनीने विविध प्रकारच्या स्टील वायरचा पोर्टफोलिओ विकसित केला आहे, ज्यामध्ये कार्बन स्टील वायर, हाय कार्बन वायर, माइल्ड स्टील वायर, गॅल्वनाइज्ड आयर्न वायर, केबल आर्मर वायर, अल्युमिनियम कंडक्टर स्टील-रिइन्फोर्स्ड केबल आणि अल्युमिनियम क्लॅड स्टील वायर यांचा समावेश आहे. तसेच ऑप्टिकल ग्राउंड वायर आणि ऑप्टिकल फायबर केबलचा देखील तिच्या उत्पादनांत समावेश आहे. कंपनीची उपस्थिती २५ भारतीय राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहे आणि ती ३० हून अधिक देशांना तिची उत्पादने निर्यात देखील करते.

सिस्टेमॅटिक इंडस्ट्रीजच्या महसूल आणि करोत्तर नफ्यात, ३१ मार्च २०२५ अखेर, वार्षिक तुलनेत अनुक्रमे २१ टक्के आणि ४९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीच्या चार उत्पादन सुविधांपैकी तीन दमन आणि दीवमध्ये, तर एक वलसाड, गुजरात येथे स्थित आहे. ज्यांची एकत्रित वार्षिक क्षमता स्टील वायरसाठी प्रति वर्ष १,००,००० मेट्रिक टन, ऑप्टिकल ग्राउंड वायरसाठी ६,००० किलोमीटर आणि ऑप्टिकल फायबर केबलसाठी ४८,००० किलोमीटर अशी आहे.