मुंबई : ग्राहकोपयोगी बहुविध व्यवसायांत कार्यरत समूह आयटीसी लिमिटेडमधून हॉटेल व्यवसायाच्या विलगीकरणांतून, स्वतंत्र कंपनीत रूपांतरित झालेल्या आयटीसी हॉटेल्स लिमिटेडचे समभाग गुरुवारच्या सत्रात १८० रुपयांवर सूचिबद्ध झाले.

गेल्या वर्षी, आयटीसीने भागधारकांसाठी मूल्यवर्धनाच्या दृष्टीकोनातून त्यांच्या हॉटेल व्यवसायाचे विलगीकरण करण्याचा निर्णय घेतला. आयटीसीच्या हॉटेल व्यवसायाचे स्वतंत्र कंपनीतील विलगीकरण हे १ जानेवारी २०२५ पासून लागू करण्यात आले. आयटीसी हॉटेल्स लिमिटेडचे समभाग देखील आयटीसी लिमिटेडकडून भांडवली बाजारात सूचिबद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी विलगीकरण गुणोत्तर (डिमर्जर रेशो) १:१० निश्चित करण्यात आला होता. याचाच अर्थ असा ६ जानेवारी २०२५ रोजी ज्या भागधारकांकडे आयटीसीचे १० समभाग असतील, विलगीकरणानंतर आयटीसी हॉटेल्सचा एक समभाग प्राप्त झाला आहे. विलगीकरण योजनेनुसार, आयटीसीच्या भागधारकांची आयटीसी हॉटेल्समध्ये १०० टक्के, म्हणजे सुमारे ६० टक्के थेट आणि आयटीसीमधील त्यांच्या भागधारणेद्वारे सुमारे ४० टक्के मालकी राहिल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयटीसी समूहाकडून विविध सहा नाममुद्रांखाली देशभरात १३ हजारांहून अधिक खोल्या असलेल्या १४० हॉटेल मालमत्ता सध्या चालविल्या जात आहेत. या सर्व मालमत्ता नवीन आयटीसी हॉटेल्स या कंपनीच्या आधिपत्याखाली येतील. पुढील ४ ते ५ वर्षांत खोल्यांची संख्या १८ हजारांवर आणि एकूण हॉटेल मालमत्ता २०० वर नेण्याचे कंपनीचे नियोजन आहे. योजनेनुसार, हॉटेल व्यवसायाचा भाग असलेल्या हॉस्पिटॅलिटी संस्थांमधील गुंतवणूक – बे आयलंड हॉटेल्स लिमिटेड, फॉर्च्यून पार्क हॉटेल्स लिमिटेड, लँडबेस इंडिया लिमिटेड, श्रीनिवास रिसॉर्ट्स लिमिटेड, वेलकॉमहॉटेल्स लंका प्रायव्हेट लिमिटेड, गुजरात हॉटेल्स लिमिटेड, इंटरनॅशनल ट्रॅव्हल हाऊस लिमिटेड आणि महाराजा हेरिटेज रिसॉर्ट्स लिमिटेड – आयटीसी हॉटेल्समध्ये हस्तांतरित करण्यात आले आहेत.

दिवसअखेर आयटीसी हॉटेल्सचा समभाग १७१.८५ रुपयांवर स्थिरावला. समभागाने दिवसभरातील सत्रात १८० रुपयांची उच्चांकी आणि १७१ रुपयांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला. सध्याच्या समभागांच्या बाजारभावानुसार, आयटीसी हॉटेल्सचे ३५,७६४ कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे. 

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Itc group hotel company enters in stock market print eco news zws