मुंबईः कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये (ईपीएफओ) सरलेल्या डिसेंबर २०२४ या महिन्यात १६ लाख पाच हजार नवीन सदस्यांची भर पडली आहे. त्याआधीच्या नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत संघटनेच्या सदस्यांमध्ये ९.६९ टक्के वाढ नोंदविण्यात आली, अशी माहिती केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या आकडेवारीतून मंगळवारी समोर आली.

‘ईपीएफओ’च्या सदस्य संख्येत डिसेंबर महिन्यात १६ लाख ५ हजारांची वाढ झाली आहे. डिसेंबर २०२३ च्या तुलनेत सदस्य संख्येतील वाढ २.७४ टक्के आहे. ईपीएफओचे सदस्यत्व पहिल्यांदाच स्वीकारणाऱ्यांची संख्या ८ लाख ४७ हजार आहे. त्यात डिसेंबर २०२३ च्या तुलनेत ०.७३ टक्के वाढ झाली आहे. नव्याने सदस्यत्व स्वीकारणाऱ्यांमध्ये वाढ होण्यामागे रोजगाराच्या वाढत्या संधी, कर्मचारी लाभाबद्दल वाढलेली जागरूकता कारणीभूत ठरल्याचे कामगार मंत्रालयाने म्हटले आहे.

ईपीएफओच्या नवीन सदस्यांमध्ये १८ ते २५ वयोगटातील सदस्यांचे प्रमाण अधिक आहे. या वयोगटातील ४ लाख ८५ हजार नवीन सदस्य असून, त्यांचे प्रमाण ५७.२९ टक्के आहे. यामुळे तरूण आणि पहिल्यांदाच रोजगाराची संधी मिळालेल्या सदस्यांचे प्रमाण जास्त आहे. डिसेंबर २०२४ मधील ईपीएफओच्या नवीन सदस्यांमध्ये महिलांची संख्या २ लाख २२ हजार आहे. ईपीएफओमधून बाहेर पडलेले १५ लाख १२ हजार सदस्य पुन्हा संघटनेत (इतर आस्थापनांत सेवेमुळे) समाविष्ट झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job opportunities for 8 5 lakh youth in december print eco news amy