महिंद्र समूह प्रवास आणि पर्यटन क्षेत्रासह आतिथ्य क्षेत्रात अधिक जोमाने आपली उपस्थिती वाढविण्यासाठी विविध मार्गांचा शोध घेत आहे, अशी माहिती समूहाचे मुख्याधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक अनिश शहा यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

महिंद्र हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेडचा विस्तार हा २०३० पर्यंत १०,००० खोल्यापर्यंत करण्याची योजना आहे. करोना महासाथीनंतर देशांतर्गत पर्यटन आणि लोकांचा हिंडण्या-फिरण्याकडे कल ज्या प्रकारे वाढला आहे, तो पाहता समूहाची आतिथ्य क्षेत्रातील (हॉस्पिटॅलिटी) शाखा असलेल्या महिंद्र हॉलिडेजने आणखी विस्ताराच्या वाटा अनुसरणे आवश्यक ठरले आहे. नियोजित विस्तार आणखी जलद आणि मोठा असेल असे प्रयत्न असल्याचे शहा यांनी सूचित केले.

भारतातील अव्वल दर्जाची आतिथ्य क्षेत्रातील कंपनी बनणे असे आमचे ध्येय अगदी सुस्पष्ट आहे. त्यासाठी विविध पर्यायांचा विचार केला जाईल, ते अधिक विकसित केले जातील. महिंद्र हॉलिडेज ही कंपनी त्या अंगाने अनेक नवीन उपक्रम राबवत आहे. महिंद्र समूह पारंपारिक हॉटेल्सपासून दूर का राहिला आहे आणि फक्त क्लब महिंद्रा व्यवसायापुरता मर्यादित का राहिला आहे असे विचारले असता, शहा म्हणाले, ते भूतकाळातील प्रारूप होते परंतु आता या व्यवसायातील विविध पर्यायांकडे पाहिले जात आहे आणि नवीन संधीच्या आम्ही शोधात आहोत.

महिंद्र हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडियाने आर्थिक वर्ष २०३० पर्यंत त्यांच्या खोल्यांची संख्या १०,००० पर्यंत वाढवण्याच्या एकूण उद्दिष्टाचा भाग म्हणून या आर्थिक वर्षात सुमारे १,००० खोल्यांची नव्याने भर घालण्याची योजना आखली आहे. ३० जून २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीत, महिंद्र हॉलिडेजच्या एकूण खोल्यांची संख्या ५,७९४ आहे. कंपनीकडून संपूर्ण भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रिसॉर्ट्सचे जाळे चालविले जाते, सदस्यत्वावर आधारीत या पध्दतीत लोकांना उत्तम निवास पर्याय आणि उमद्या सहलीचा अनुभव सदस्यांना प्रदान केला जातो.