नवी दिल्ली, पीटीआय
महिंद्र अँड महिंद्र आणि टोरंटो येथे मुख्यालय असलेला कॅनडाची वित्तीय सेवा समूह असलेल्या मनुलाइफने ५०:५० अशा समान भागीदारीने आयुर्विमा व्यवसायासाठी संयुक्त कंपनी सुरू करण्याचा करार केला आहे. उभयतांमध्ये मालमत्ता व्यवस्थापन व्यवसायात आधीपासून सहकार्य सुरू असून, महिंद्र मनुलाइफ म्युच्युअल फंड हा संयुक्त उपक्रम देशात सुरू आहे.
महिंद्र आणि मनुलाइफ या दोन्ही भागीदारांकडून एकत्रितपणे या भागीदारीसाठी ७,२०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे, अशी माहिती महिंद्र समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक अनिश शहा यांनी गुरुवारी दिली.
देशातील मुख्यतः ग्रामीण आणि निमशहरी भागात आयुर्विमा सेवा पोहोचवून भारतातील या संयुक्त उपक्रमाला आघाडीची आयुर्विमा कंपनी बनवण्याची आकांक्षा आहे. भारताच्या विमा क्षेत्रात मोठी स्पर्धा आहे. मात्र ग्रामीण भागात अजूनही विम्याचा हवा तास प्रचार-प्रसार झालेला नाही, असे शहा म्हणाले.
महिंद्र-मनुलाइफ येत्या दोन-तीन महिन्यांत विमा नियामक ‘इर्डा’कडे विमा व्यवसायाच्या परवान्यासाठी अर्ज करतील. प्रत्यक्षात हा संयुक्त उपक्रम कार्यरत होण्यास १५ ते १८ महिन्यांचा कालावधी लागणे अपेक्षित आहे. महिंद्र अँड महिंद्रला तिच्या बँकेतर वित्तीय कंपनी असलेल्या महिंद्र फायनान्सकडून मिळणाऱ्या लाभांशातून या संयुक्त उपक्रमात गुंतवणूक केली जाईल. प्रत्येक भागधारकाकडून एकूण ३,६०० कोटी भांडवली गुंवणूक केली जाईल, ज्यामध्ये पहिल्या पाच वर्षांत १,२५० कोटी रुपये भागभांडवल गुंतविले जाणे अपेक्षित आहे.
महिंद्र नाममुद्रेची ताकद, ग्रामीण आणि निमशहरी भारतातील सखोल वितरण क्षमता आणि आखलेल्या धोरणाच्या अंमलबजावणीची हातोटी यामुळे आयुर्विमा क्षेत्रातील या भागीदारीचाही विस्तार होईल. या क्षेत्रात कंपनीला प्रचंड संधी असून आगामी काळात आयुर्विम्यापाठोपाठ, सामान्य विमा क्षेत्रात देखील पाऊल टाकण्याचा विचार केला जाईल. तंत्रज्ञानाच्या वापरावर लक्ष केंद्रित करून भारतात एक कार्यक्षम, ग्राहक-केंद्रित विमा कंपनी तयार केली जाईल, असे शहा म्हणाले.
भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या विमा बाजारपेठांपैकी एक आहे. यामुळे आमची वैविध्यपूर्ण विमा उत्पादने महिंद्रशी सहयोगातून व्यापक ग्राहकांपर्यंत पोहोचविले जातील, असे मनुलाइफचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी फिल विदरिंग्टन म्हणाले.
मनुलाइफ फायनान्शियल कॉर्पोरेशनमध्ये वर्ष २०२४ च्या अखेरीस, ३७,००० हून अधिक कर्मचारी, १०९,००० हून अधिक वितरक आणि हजारो वितरण भागीदार कार्यरत होते. जे कॅनडा, आशिया, युरोप आणि अमेरिकेतील ३.६ कोटींहून अधिक ग्राहकांना सेवा देत आहेत.
