मुंबई : एखादी नवीन कल्पना मांडून त्यातून उद्योगाची उभारणी करण्याचे आव्हान हमरोचे संस्थापक मिलिंद पडोळे यांनी यशस्वीपणे पार पाडले आहे.पुण्यातील मिलिंद पडोळे या उद्योजकाने रोबोटिक क्षेत्रातील नवतंत्रज्ञानाची कास धरून ‘हमरो’ची स्थापना केली. या कंपनीने वाहननिर्मिती क्षेत्रातील कंपन्यांसाठी वाहनांच्या वेल्डिंगसाठी स्वयंचलित रोबो यंत्रणा बनविली. कंपनीने साडेसात हजारांहून अधिक रोबो कंपन्यांना आतापर्यंत दिले आहेत.
याबाबत ‘हमरो’चे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद पडोळे म्हणाले, की ‘हमरो’ने वाहन क्षेत्रापुरते मर्यादित न राहता गोदामामध्ये काम करणारे रोबो विकसित केले. सध्या हे रोबो अमेरिकेसह युरोपमधील गोदामांमध्ये कार्यरत आहेत. मालमोटारीतून सामान उतरवून ते गोदामामध्ये व्यवस्थित रचून ठेवण्यापर्यंतचे काम हे रोबो करतात. यात मानवी हस्तक्षेपाची आवश्यकता नसते.
काम संपल्यानंतर हे रोबो स्वत: चार्जिंग स्थानकात जाऊन चार्ज होतात. अमेरिका आणि युरोपमध्ये मनुष्यबळाचा खर्च जास्त असल्याने कंपन्यांकडून या रोबोंना तिथे पसंती आहे.
पडोळे सध्या वाहन निर्मिती क्षेत्रातील महिंद्रा अँड महिंद्र, पियाजियो आणि अन्य आघाडीच्या वाहन कंपन्यांना वेल्डिंगसाठी स्वयंचलित रोबो यंत्रणा पुरवते. याचबरोबर जगातील अग्रणी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अॅमेझॉनला त्यांच्या पार्सल सुविधा केंद्रांमध्ये अर्थात गोदामामध्ये सामानाची ने-आण करण्यासाठी रोबो देखील पुरवले आहेत.
बऱ्याचदा गोदामामध्ये मशीनच्या माध्यमातून मोठे अपघात झाल्याचे आपण ऐकले आहे. मात्र हे रोबो स्वयंचलित असले तरी त्यांच्या मार्गात कोणी व्यक्ती चुकून आल्यास ते आपला मार्ग स्वतःहून बदलतात. यामुळे त्या व्यक्तीला कोणतीही इजा पोहोचत नाही.