पीटीआय, नवी दिल्ली
वाहन निर्मितीतील आघाडीच्या मारुती सुझुकी इंडियाचा देशाच्या वाहन बाजारपेठेवर दबदबा राहिला असून, कंपनीने तीन कोटी वाहनांच्या विक्रीचा अनोखा टप्पा गाठून हे दाखवून दिले. जवळपास ४२ वर्षे मारुतीची वाहने भारतीय बाजारपेठेत असून, विक्रीचा इतका मोठा पल्ला गाठणारी ती पहिलीच कंपनी आहे.

मारुतीने २८ वर्षे दोन महिन्यांच्या कालावधीत एक कोटी वाहनांच्या विक्रीचा टप्पा ओलांडला होता. मात्र त्यापुढील एक कोटी वाहनांच्या विक्रीसाठी सात वर्षे आणि पाच महिन्यांचा कालावधी, तर त्या नंतरचा एक कोटी वाहनांचा टप्पा तिने सहा वर्षे चार महिन्यांच्या विक्रमी कालावधीत गाठला, अशी माहिती मारुती सुझुकी इंडियाने बुधवारी दिली.

भारतात विकल्या गेलेल्या मारुती सुझुकीच्या ३ कोटी वाहनांमध्ये, अल्टोचा वाटा ४७ लाख इतका आहे, त्यानंतर सुमारे ३४ लाख वॅगन आर आणि ३२ लाख स्विफ्ट ग्राहकांच्या सेवेत आहेत. कॉम्पॅक्ट एसयूव्ही ब्रेझा आणि फ्रॉन्क्सचा देखील कंपनीच्या लोकप्रिय आणि सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पहिल्या दहा वाहनांमध्ये समावेश आहे.

कंपनीने १४ डिसेंबर १९८३ रोजी पहिल्या ग्राहकाला मारुती ८०० च्या किल्ल्या सोपविल्या होत्या. मारुती सुझुकी सध्या १९ श्रेणींमध्ये १७० हून अधिक प्रकारच्या वाहनांची विक्री करते.

दर हजार लोकांमागे ३३ वाहने

भारतात दर १,००० लोकांमागे अंदाजे ३३ वापरात असलेल्या वाहनांची संख्या आहे आणि आम्हाला अजून बराच मोठा टप्पा गाठावयचा असून प्रवास अजून संपलेला नाही. प्रत्येक कुटुंबांचे स्वतःचे वाहन घेण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कंपनी सर्वतोपरी प्रयत्न करत राहील, असे मारुती सुझुकी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हिसाशी टेकुची म्हणाले.