पुणे : मर्सिडीज बेंझने १९९४ पासून भारतात २ लाख मोटारींच्या विक्रीचा टप्पा गाठला आहे. त्यातील १.५ लाख मोटारींची विक्री गेल्या दशकभरात झाली आहे. तरुण भारतीयांकडून मोटारींना जास्त पसंती मिळत आहे, अशी माहिती मर्सिडीज बेंझ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष अय्यर यांनी गुरुवारी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मर्सिडीज बेंझच्या वार्षिक पत्रकार परिषदेत संतोष अय्यर यांनी ‘ईक्यूएस एसयूव्ही ४५०’ आणि ‘जी ५८०’ या दोन नवीन इलेक्ट्रिक मोटारी सादर केल्या. या वेळी बोलताना ते म्हणाले की, कंपनीने देशातील ३० वर्षांच्या व्यवसायाच्या कालावधीत २०२४ मध्ये मोटारींची उच्चांकी विक्री नोंदविली. गेल्या वर्षी १९ हजार ५६५ मोटारींची विक्री झाली असून, आधीच्या वर्षाच्या तुलनेत त्यात १२.४ टक्के वाढ झाली आहे. देशात २ लाख मोटारींच्या विक्रीचा मैलाचा टप्पा मर्सिडीजने गाठला आहे. कंपनीच्या टॉप एंड मॉडेलना जास्त पसंती मिळत आहे. चालू वर्षात कंपनी देशात एकूण आठ नवीन मोटारी सादर करणार आहे.

हेही वाचा >>>मोठ्या आयटी कंपनीकडून भागधारकांना जबरदस्त ‘डिव्हीडंड’; अजूनही समभाग खरेदीची संधी

मर्सिडीज बेंझने सामाजिक उत्तरदायित्वांतर्गत रस्ते सुरक्षेसाठी ७.५ कोटी रुपये खर्च करण्याची घोषणा केली. याबाबत अय्यर म्हणाले की, कंपनीकडून महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग आणि हैदराबादमधील निजामाबाद कॉरिडॉर सुरक्षित करण्यासाठी पावले उचलली जाणार आहेत. या दोन्ही महामार्गांवरील अपघात आणि अपघाती मृत्यू कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mercedes benz crosses 2 lakh car sales print eco news amy