लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेचे एयू स्मॉल फायनान्स बँकेत (एयू एसएफबी) विलीनीकरण होणार असून, नियामकांच्या मंजुरीनंतर १ फेब्रुवारी २०२४ पासून ते पूर्णत्त्वाला जाणे अपेक्षित आहे. या विलीनीकरणामुळे एयू स्मॉल फायनान्स बँकेला सूक्ष्म कर्ज वितरण क्षेत्रात उतरता येईल आणि दक्षिण भारतात आपले अस्तित्व वाढवता येईल. एयूचा समभाग सोमवारच्या व्यवहारात ५ टक्क्यांच्या उसळीसह ६५५.३५ रुपयांवर स्थिरावला.

एयू स्मॉल फायनान्स बँकेने भांडवली बाजाराला या विलीनीकरणाबाबत सोमवारी माहिती दिली. या विलीनीकरणानंतर फिनकेअरकडून ६२५ कोटी रुपयांच्या प्रारंभिक समभाग विक्रीचा (आयपीओ) प्रस्ताव पुढे ढकलला जाईल. विलीनीकरणाआधी प्रवर्तक कंपनी बँकेत ७०० कोटी रुपयांचे भांडवल टाकणार आहे, अशी माहिती फिनकेअरच्या नामनिर्देशित संचालक दिव्या सेहगल यांनी दिली. या विलीनीकरणाअंतर्गत फिनकेअरच्या भागधारकांना दोन हजार समभागांमागे एयूचे ५७९ समभाग मिळणार आहेत. तसेच, फिनकेअरचा एयूमध्ये ९.९ टक्के हिस्सा असेल.

हेही वाचा – एक जानेवारी २०२४ पासून ग्राहकांना पॉलिसीच्या मूलभूत वैशिष्ट्ये सांगणे विमा कंपन्यांना बंधनकारक

हेही वाचा – Gold-Silver Price on 31 October 2023: ग्राहकांनो, सोन्याच्या किमती किंचित झाल्या कमी, वाचा मुंबईत आजचा भाव किती…

याबाबत एयू बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय अगरवाल म्हणाले की, विलीनीकरणानंतर आम्हाला सूक्ष्म आर्थिक क्षेत्रात उतरता येईल. सूक्ष्म आर्थिक वित्तीय व्यवसायामध्ये निव्वळ व्याज उत्पन्न सुमारे १० टक्के आहे. नफाक्षमतेचे हे प्रमाण खूपच चांगले आहे. याचबरोबर राजकीय हस्तक्षेप ही भारतात फार मोठी समस्या राहिलेली नाही. दक्षिण भारतातील बाजारपेठेत विस्तार करण्यासाठी आम्हाला काही वर्षे लागली असती मात्र, विलीनीकरणामुळे हे वेगाने घडून येईल.