मुंबई : भारत सरकारने पीएम मित्रा (मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजनल आणि ॲपरल) पार्क उपक्रमाचा एक भाग म्हणून एकात्मिक वस्त्रोद्योग संकुलाची निर्मिती करण्याची घोषणा केली, त्यापैकी महाराष्ट्रात अमरावती येथे टेक्सटाईल पार्कला मंजुरी मिळाली आहे. हे टेक्सटाईल पार्क नांदगाव पेठजवळ साकारले जात असून, हे अमरावती पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क १,०२० एकर क्षेत्रफळावर उभारण्यात येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुविकसित वस्त्रोद्योग परिसंस्थेची निर्मिती आणि संधींविषयी चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने मंगळवारी (१८ एप्रिल) गुंतवणूकदारांच्या परिषदेचे मुबंईत आयोजन केले होते. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन शर्मा, सह मुख्य कार्यकारी अधिकारी पी.डी. मलिकनेर, अतिरिक्त संचालक संजय कोरबू, सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव एस.डी. खरात यांच्या उपस्थितीत पीएम मित्रा पार्कमधील विकासाच्या संधींबाबत महत्त्वाची चर्चा झाली.

हेही वाचा – Wealthiest City: जगातील सर्वात श्रीमंत शहर कोणते? भारतातील ‘या’ पाच शहरांचा समावेश, जाणून घ्या

पीएम मित्रा पार्कला प्रोत्साहन देण्यासंदर्भात एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन शर्मा म्हणाले की, राज्य सरकारच्या औद्योगिक आणि वस्त्रोद्योग धोरणांतर्गत आधीच उपलब्ध असलेल्या लाभांव्यतिरिक्त, ब्राउनफील्ड पार्क गुंतवणूकदारांसाठी उच्च अनुदानित दराने पाणी आणि वीज प्रदान केली जाईल. अमरावती येथील पीएम मित्रा पार्क हा वस्त्रोद्योग आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Midc seminar on investment opportunities in pm mitra park of amravati concluded ssb