GST मधील नवे बदल काही क्षेत्रांसाठी चिंतेचे तर काही क्षेत्रांसाठी फायद्याचे ठरण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्याचे प्रारंभिक पडसाद शेअर बाजारात दिसू लागले आहेत. २२ सप्टेंबरपासून नवे जीएसटी स्लॅब लागू करण्यात आले. त्यात १२ टक्क्यांचा स्लॅब थेट ५ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. यामध्ये ऑटो क्षेत्राचाही समावेश असल्यामुळे आज शेअर बाजारात ऑटो क्षेत्रातील कंपन्या भरधाव वेगाने दौडत असल्याचं पाहायला मिळालं. या क्षेत्रातील काही प्रमुख कंपन्यांच्या शेअर्सनं ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला तर काही कंपन्यांनी नवे उच्चांक प्रस्थापित केले.

कोणत्या कंपन्यांचे शेअर्स वधारले?

Nifty Auto Index तब्बल १ टक्क्यांनी वर आल्याचं मुंबई शेअर बाजारात पाहायला मिळालं. त्यामध्ये मारूती सुझुकी, आयशर मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा व बजाज ऑटो या कंपन्यांना निफ्टीच्या निर्देशांकामध्ये सर्वाधिक फायदा झाल्याचं दिसून आलं. मारूती सुझुकीचे शेअर्स इंट्रा डे व्यवहारांमध्ये ३ टक्क्यांनी वधारले. त्यामुळे नॅशनल स्टॉक एक्स्चेंज अर्थात NSE मध्ये मारूती सुझुकीच्या शेअर्सनं त्यांचा ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. सकाळच्या सत्रात हा शेअर निफ्टीवर सर्वाधिक फायद्यात दिसत होता.

मारूतीच्या खालोखाल आयशर मोटर्सचे शेअर्स तब्बल २.५ टक्क्यांनी वधारल्याचं पहिल्या सत्रात पाहायला मिळालं. त्यामुळे या शेअर्सनं कंपनीसाठी ५२ आठवड्यांतील नवा उच्चांक गाठला. कंपनीच्या शेअर्सचे दर ७ हजार १२२.५० रुपयांपर्यंत पोहोचले. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे शेअर्सदेखील २.६ टक्क्यांनी वधारले. इंट्रा-डे व्यवहारांमध्ये या शेअर्सची किंमत ३ हजार ६७९.२० रुपयांपर्यंत पोहोचली.

Nuvama चे टॉप फेव्हरेट शेअर्स कोणते?

वित्तसेवा पुरवठा करणारी प्रथितयश कंपनी नुवामा इन्स्टिट्युशनल इक्विटिजनं मारूती सुझुकी, टीव्हीएस, महिंद्रा अँड महिंद्रा व हिरो मोटोकॉर्प या कंपन्या सध्याच्या परिस्थितीत शेअर मार्केटमध्ये सर्वात फेव्हरेट असल्याचं म्हटलं आहे. फायनान्शियल एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, जीएसटी दरकपातीमुळे ग्राहकांचा कल या क्षेत्रातील गुंतवणुकीकडे झुकल्यामुळे ही तेजी दिसत असल्याचं Nuvama चं म्हणणं आहे. आगामी सणाच्या काळात या क्षेत्रात तेजीचं हेच चित्र कायम राहण्याची शक्यता आहे.

नव्या GST मुळे काय होणार स्वस्त?

२२ सप्टेंबरपासून लागू झालेल्या नव्या जीएसटी दरांमुळे १२ टक्के जीएसटी असणाऱ्या वस्तू स्वस्त होणार आहेत. कारण आता या वस्तूंवर १२ टक्क्यांऐवजी ५ टक्के जीएसटी लागू होणार आहे. त्यात कार, बाईक, टीव्हीसह अनेक घरगुती वस्तूंचा समावेश आहे. त्यामुळे मध्यमवर्गाला दिलासा मिळणार आहे. तसेच रोटी, पराठा, पनीर यासारख्या अनेक अन्नपदार्थांना शून्य कर श्रेणीत टाकण्यात आलं आहे. ५ टक्के आणि १८ टक्के असे जीएसटीचे दोन मुख्य स्लॅब करण्यात आले आहेत. तसेच कर्करोग, अनुवांशिक विकार, दुर्मिळ आजार आणि हृदयरोगासाठी आवश्यक असलेली ३६ औषधे आता पूर्णपणे करमुक्त करण्यात आली आहेत.