नवी दिल्ली : भारतात इलेक्ट्रिक दुचाकींच्या क्षेत्रात कडवी स्पर्धा सुरू असून, त्यात ओला इलेक्ट्रिकला बाजारातील अग्रस्थान टिकवून ठेवणे अलीकडे मोठे जिकीरीचे बनले आहे. मात्र ऑगस्ट महिन्यात आयातपर्यायी ‘फेराइट मोटर’ सर्वप्रथम सादर करून ओला इलेक्ट्रिकने तिच्या विकसनाला आता मान्यताही मिळविली आहे. चीनकडून आयात होणाऱ्या आणि पुरवठा खंडित झालेल्या दुर्मीळ खनिजांपासून मुक्त ‘फेराइट मोटर’ विकसित करण्यासाठी सरकारची मान्यता मिळविणारी ती देशातील पहिली कंपनी ठरली आहे.
इलेक्ट्रिक दुचाकी निर्मिती करणाऱ्या ओला इलेक्ट्रिकने याबाबत सोमवारी घोषणा केली. कंपनीने म्हटले आहे की, सध्या ई-वाहन क्षेत्रात दुर्मीळ खनिजांच्या (रेअर अर्थ) वापर करून बनविलेल्या मोटरचा वापर केला जातो. म्हणजेच त्यात दुर्मीळ खनिज चुंबकांचा समावेश असतो. कंपनीने त्याला पर्याय ठरेल अशा आता स्थानिक उपलब्ध खनिज सामग्रीवर आधारीत फेराइट मोटर स्वत: विकसित केली आहे. तिला तमिळनाडूतील ग्लोबल ऑटोमोटिव्ह रिसर्च सेंटरचे प्रमाणपत्र मिळाले आहे. केंद्रीय परिवहन मंत्रालयाने आखून दिलेल्या काटेकोर निकषांनुसार या मोटरची तपासणी करण्यात आल्यानंतर तिला प्रमाणपत्र बहाल करण्यात आले आहे.
ओलाच्या फेराईट मोटरची कामगिरी सध्या दुर्मीळ खनिजे व चुंबकीय मोटरएवढी असल्याचे चाचण्यांमधून समोर आले आहे. फेराईट मोटरची कार्यक्षमता, कामगिरी आणि टिकाऊपणा इतर मोटरप्रमाणेच दिसून आली आहे. सध्या ७ किलोवॉट आणि ११ किलोवॉट क्षमतेमध्ये ही मोटर उपलब्ध आहे. या मोटरची किंमत मात्र इतर मोटरच्या तुलनेत कमी आहे. याचबरोबर दुर्मीळ खनिजांच्या पुरवठा साखळीतील बदलांचा परिणाम फेराइट मोटरच्या निर्मितीवर होणार नाही, असेही ओला इलेक्ट्रिकने स्पष्ट केले.
फेराइट चुंबक काय आहे?
फेराइट चुंबक, ज्याला सिरॅमिक चुंबक असेही म्हणतात, हा एक प्रकारचा अधातूचा स्थायी चुंबक आहे जो लोह ऑक्साईड आणि बेरियम किंवा स्ट्रॉन्टियम सारख्या इतर धातू घटकांच्या संमिश्रापासून बनवला जातो. सध्या बहुतांश मोटारीत वापरात येणाऱ्या दुर्मीळ खनिजावर आधारीत चुंबकाची ते जागा घेईल.
लवकरच वापरासह स्पर्धेत आघाडीचा मानस
केंद्र सरकारची मान्यता मिळाल्याने ओला इलेक्ट्रिककडून सर्वच उत्पादनांमध्ये फेराइट मॅग्नेटचा वापर लवकरच सुरू केला जाणार आहे. या मोटरमुळे कोट्यवधी भारतीय ग्राहकांना कार्यक्षम, शाश्वत आणि परवडण्याजोगी उत्पादने मिळतील, असेही कंपनीने नमूद केले आहे. ओला इलेक्ट्रिकने या आधी स्वदेशात निर्मित आणि अधिक क्षमतेच्या ‘४६८० भारत सेल’चे विकसन, निर्मिती आणि वापरातून तिच्या अन्य स्पर्धकांना मात दिली आहे.