‘अंथरून पाहून पाय पसरा’ असा सल्ला जुनी-जाणती माणसं देत असतात. ९० आणि २००० च्या दशकांपर्यंत बहुसंख्य लोकांनी या सल्ल्याचं तंतोतंत पालन केलं. आजही असंख्य लोक या नियम पाळतात. मात्र,अलीकडे एक असा वर्ग तयार झाला आहे. जो हा सल्ला मानत नाही. मिलेनियल्स व जेन झी पिढीतले काही तरुण म्हणू लागले आहेत की “अंथरून पाहून पाय पसरण्याऐवजी आपण हवे तसे पाय पसरण्यासाठी अंथरूनच मोठं करुया.” एका अर्थाने हा चांगला विचार आहे. परंतु, काहीजण यापुढे जाऊन मोठं अंथरून घेण्यासाठी कर्जबाजारी होण्याचा पर्याय निवडू लागले आहेत. रेडिटवर यावर झालेल्या एका चर्चेने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

अनेकजण महागड्या गाड्या खरेदी करण्यासाठी मोठा आर्थिक भार सहन करत आहेत. केवळ महत्त्वकांक्षेपोटी व समाजातील स्थान दर्शवण्यासाठी, खोटी प्रतिष्ठा मिरवण्यासाठी, लोकांचं लक्ष वेधण्यासाठी मर्सिडीज-बेन्झ, बीएमडब्ल्यू, पोर्शे, जॅग्वार, लँड रोव्हरसह लग्झरी कार खरेदी करतात. ती कार खरेदी करण्याची त्यांची ऐपत असो अथवा नसो, आपल्यावर किती आर्थिक बोजा पडेल याचा विचार न करता ईएमआयवर (कर्ज घेऊन) महागड्या गाड्या खरेदी करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे.

दोन लाख पगार असणारे तरुण ८० लाखांची मर्सिडीज घेतात तेव्हा…

एका तरुणाने मर्सिडीज-बेन्झ कंपनीच्या डीलरशिपमध्ये त्याला आलेला एक अनुभव रेडिटवर शेअर केला आहे. त्याने म्हटलं आहे की काही लोक ज्यांचा मासिक पगार १.४ लाख रुपये ते २ लाख रुपयांच्या दरम्यान आहे असे तरुण ६० ते ८० लाख रुपयांची मर्सिडीज-कार खरेदी करतात. या कारसाठी सात ते नऊ लाख सुरुवातीला भरतात आणि उर्वरित रकमेसाठी कर्ज (कार लोन) काढतात.

प्रतिष्ठा नव्हे आर्थिक आत्महत्या

या युजरने म्हटलं आहे की “मला एक गोष्ट समजली नाही की एखादी व्यक्ती स्वतःला इतकं मोठं कर्ज घेण्यासाठी कसं तयार करतात. एका कारसाठी सात-आठ वर्षे कर्जाचे हप्ते भरायचे ही गोष्ट या लोकांना कशी पटते? ६० ते ८० लाखांची कार घेण्यासाठी सव्वा ते दिड कोटी रुपये हप्त्यांच्या माध्यमातून भरायचे, हे सगळं कशासाठी? केवळ समाजात खोटी प्रतिष्ठा मिरवण्यासाठी? श्रीमंत दिसण्यासाठी? ही एक प्रकारची आर्थिक आत्महत्याच आहे.”

रेडिट युजरच्या या पोस्टवर अनेक जण आपापली मतं व्यक्त करत आहेत. काहींचं म्हणणं आहे की कोणी खानदानी श्रीमंत असेल किंवा कोट्यवधी रुपयांच्या आसपास वार्षिक पॅकेज असणाऱ्या व्यक्तीने इतकी महागडी कार खरेदी करावी. महिन्याला दोन लाख रुपये कमावणारा ईएमआयवर ८० लाखांची मर्सिडीज कार खरेदी करत असेल तर त्याला नुसतं बावळट नव्हे तर गाढव म्हणायला हवं.

नेटकऱ्यांकडून सेकेंड हँड कार खरेदीचा सल्ला

दुसऱ्या एका युजरने सल्ला दिला आहे की “तुम्हाला बडेजाव करायचाच असेल तर सेकेंड हँड कार खरेदी करू शकता. हली लोक तुमच्याकडे कोणता फोन आहे, कोणती गाडी आहे, तुम्ही कोणत्या कंपनीचे कपडे परिधान करता, कोणत्या घरात व कुठल्या परिसरात राहता त्यावरून तुमच्याबद्दलचं मत तयार करतात. त्यामुळे काहीजण असा बडेजावपणा करत असतात. भारतात आयफोनची प्रचंड किंमत आणि तरीदेखील वाढलेली विक्री हे त्याचंच उदाहरण आहे.”