पीटीआय, नवी दिल्ली
प्राप्तिकर विभागाने ‘आयटीआर-यू’ हा नवीन प्राप्तिकर विवरणपत्र अर्ज नमूना अधिसूचित केला असून, ज्यामुळे करदात्यांना मुदत उलटून गेल्यापासून अटी-शर्तींसह चार वर्षांपर्यंत अद्ययावत विवरणपत्र (अपडेटेड रिटर्न) दाखल करता येणार आहे.
वित्त कायदा, २०२५ ने संबंधित मूल्यांकन वर्षाच्या समाप्तीपासून २४ महिन्यांवरून, ४८ महिन्यांपर्यंत अद्ययावत विवरणपत्र दाखल करण्याची मुदत वाढवली आहे. मुदत समाप्तीपासून १२ महिने आणि २४ महिन्यांच्या आत दाखल केलेल्या ‘आयटीआर-यू’साठी, अनुक्रमे २५ टक्के आणि ५० टक्के अतिरिक्त कर भरावा लागेल. ३६ महिने आणि ४८ महिन्यांच्या आत दाखल केलेल्या ‘आयटीआर-यू’साठी, करदात्याला ६० टक्के आणि ७० टक्के अतिरिक्त कर भरावा लागेल. मागील तीन वर्षात, असे सुमारे ९० लाख प्राप्तिकर विवरण पत्र दाखल करण्यात आले आहेत, त्यामाध्यमातून ८,५०० कोटी रुपये अतिरिक्त महसूल सरकारला प्राप्त झाला आहे.