लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने सरलेल्या जून तिमाहीत २६,९९४ कोटी रुपयांचा विक्रमी निव्वळ नफा नोंदवला आहे. ग्राहक व्यवसायांच्या भरघोस कामगिरीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत ही नफ्यात ७८.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीचे प्रतिसमभाग नफा १९.९५ रुपये राहिला आहे, जो मागील वर्षीच्या याच कालावधीत १५,१३८ कोटी रुपये नोंदवला होता. तसेच याआधीच्या म्हणेजच ३१ मार्च रोजी संपलेल्या मागील तिमाहीत १९,४०७ कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. या तुलनेत विद्यमान तिमाहीत नफा ३९ टक्क्यांनी वधारला आहे.
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहातील किरकोळ वस्तू विक्री व्यवसाय आणि दूरसंचार कंपनीने देखील नफ्यात वाढ नोंदवली आहे. ग्राहकांच्या संख्येत वाढ झाल्याने जिओच्या नफ्यात वाढ होण्यास मदत झाली आहे, तर विस्तारित स्टोअर नेटवर्कमधील ग्राहकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे किरकोळ व्यवसायाची कामगिरी स्थिर राहिली.
आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीत मिळणारा महसूल ५.२६ टक्क्यांनी वाढून २.४८ लाख कोटी रुपयांवर पोहोचला, जो मागील वर्षीच्या याच कालावधीतील २.३६ लाख कोटी रुपये राहिला होता. खनिज तेलाच्या किमतीत घट आणि पुरवठ्यातील व्यत्ययामुळे ओ२सी नावाच्या मुख्य तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल्स व्यवसायात वार्षिक १.५ टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र जिओ-बीपीद्वारे इंधनांच्या वाढत्या विक्रीमुळे महसुलात वाढ झाली आहे. रिलायन्सने आर्थिक वर्ष २०२५-२६ ची सुरुवात मजबूत आर्थिक कामगिरीने केली आहे, असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले.
जिओच्या नफ्यात वाढ
दूरसंचार कंपनी असलेल्या जिओ प्लॅटफॉर्म्सचा निव्वळ नफा पहिल्या तिमाहीत २५ टक्क्यांनी वाढून ७,११० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तसेच कंपनीचा महसूल १९ टक्क्यांनी वाढून ४१,०५४ कोटी रुपये झाला आहे.