भाज्या, डाळी, मांस आणि दुधासह अन्नपदार्थांच्या किमती कमी झाल्यामुळे जूनमध्ये किरकोळ महागाई दराची साडेसहा वर्षांच्या नीचांकी २.१० टक्क्यांपर्यंत घसरण दिसून आली. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित हा महागाई दर आधीच्या मे महिन्यात २.८२ टक्के आणि गेल्या वर्षी म्हणजे जून २०२४ मध्ये ५.०८ टक्के पातळीवर होता. सोमवारीच जाहीर झालेल्या घाऊक महागाई दरही ऑक्टोबर २०२३ नंतर प्रथमच शून्याखाली नकारात्मक वळण घेताना दिसून आला आहे.
सरलेल्या जून महिन्यातील ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर २.१ टक्के नोंदविला गेल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. चलनवाढीचा हा बहुवार्षिक नीचांकी स्तर पाहता, रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपातीचे चक्र हे आगामी काळातही सुरू राहू शकेल, असा विश्लेषकांचा होरा आहे
उल्लेखनीय म्हणजे महिनागणिक चलनवाढीच्या दरात तब्बल ७२ आधार बिंदूंची घसरण झाली आहे. ही गेल्या काही वर्षांतील सर्वात तीव्र स्वरूपाची मासिक घसरण असून, जून २०२५ मधील २.१० टक्क्यांचा दर हा जानेवारी २०१९ नंतरचा सर्वात कमी चलनवाढीचा दर असल्याचे ‘एनएसओ’ने स्पष्ट केले आहे. या आधी जानेवारी २०१९ मध्ये किरकोळ चलनवाढ १.९७ टक्के या नीचांकी पातळीवर नोंदवण्यात आली होती.
एनएसओच्या निवेदनानुसार, जून २०२५ मध्ये प्रमुख चलनवाढ आणि खाद्यान्न महागाईतही लक्षणीय घट झाली आहे. प्रामुख्याने भाज्या, डाळी आणि त्यावर आधारीत उत्पादने, मांस आणि मासे, तृणधान्ये आणि संलग्न उत्पादने, साखर आणि मिठाई, दूध आणि दुग्धजन्य उत्पादने आणि मसाल्यांच्या किमतीत घट झाल्यामुळे हे शक्य झाले आहे.
ग्रामीण, शहरी दोन्हींना दिलासा
ग्रामीण भागात, जूनमध्ये किरकोळ महागाई दर १.७२ टक्क्यांवर घसरला आहे, जो मे महिन्यात २.५९ टक्क्यांच्या पातळीवर होता. शहरी भागात, किरकोळ महागाई दर काहीसा जास्त असला तरी तोही २.५६ टक्क्यांपर्यंत घटला आहे. मागील महिन्यात तो ३.१२ टक्क्यांच्या पातळीवर होता. शहरी खाद्यान्न महागाईत मोठी घट दिसून आली, जी मे महिन्यातील १.०१ टक्क्यांच्या पातळीवरून जूनमध्ये (उणे) -१.२२ टक्क्यांपर्यंत घसरली आहे.
घाऊक महागाई दर जूनमध्ये उणे ०.१३ टक्क्यांवर
अन्नधान्य आणि इंधनाच्या किमती लक्षणीय घसल्याने सरलेल्या जूनमध्ये घाऊक किंमत निर्देशांकांवर आधारीत महागाई दर उणे (-) ०.१३ टक्क्यांवर घसरला. ऑक्टोबर २०२३ नंतर प्रथमच घाऊक महागाई दर हा शून्याखाली नकारात्मक वळण घेताना दिसून आला आहे.
सोमवारी प्रसिद्ध झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, जून २०२५ मध्ये घाऊक महागाईचा नकारात्मक दर हा प्रामुख्याने अन्नधान्य वस्तू, खनिज तेल, मूलभूत धातूंचे उत्पादन, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू इत्यादींच्या किमतींमध्ये घट झाल्यामुळे आहे. उद्योग मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार, उत्पादित वस्तूंच्या किमतीतही घट झाली आहे.
घाऊक किंमत निर्देशांकांवर महागाई दर आधीच्या मे महिन्यात ०.३९ टक्के पातळीवर होता. त्यातुलनेत जूनमध्ये त्यात ५२ आधार बिंदूंची घसरण झाली आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये महागाई दर ३.४३ टक्के पातळीवर होता. घाऊक किंमत निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये अन्नधान्य वस्तूंमध्ये ३.७५ टक्के घसरण झाली, तर मे महिन्यात या घसरणीचे प्रमाण १.५६ टक्के पातळीवर होते. मुख्यत: भाज्यांच्या किमतीत जूनमध्ये मोठी घसरण झाली. वार्षिक तुलनेत भाज्यांच्या किमती जूनमध्ये २२.६५ टक्क्यांनी ओसरल्या. मे महिन्यांतही त्यात २१.६२ टक्के घसरण झाली होती. उत्पादित वस्तूंच्या बाबतीत, किमतीतील वाढ १.९७ टक्के राहिली, जी मे महिन्यात २.०४ टक्के होती. जूनमध्ये इंधन आणि विजेच्या किमतीही २.६५ टक्के घसरल्या, ज्यात मे महिन्यात २.२७ टक्के घसरण दिसून आली होती.