मुंबई : आखाती देशांमधील युद्ध निवळण्याच्या आशेने खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती घसरल्याने रुपया मंगळवारी ७५ पैशांनी सावरून प्रति डॉलर ८६.०३ वर बंद झाला. देशांतर्गत शेअर बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे स्थानिक चलनाला बळकटी मिळाली.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण-इस्रायल युद्धविरामाची घोषणा केल्याने जागतिक बाजारात ब्रेंट क्रूड वायदे ३.१९ टक्क्यांच्या घसरणीसह पिंपामागे ६९.२० डॉलरपर्यंत खाली आले. परकीय चलन बाजारात, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाने ८६.०७ पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली आणि ८५.९१ – ८६.२७ च्या श्रेणीत व्यवहार करत प्रति डॉलर ८६.०३ पातळीवर बंद झाला. सोमवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया २३ पैशांनी घसरून ८६.७८ या पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला होता.

इस्रायल-इराणमधील युद्धबंदीच्या वृत्ताने जागतिक जोखीम भावनांमध्ये सुधारणा झाल्यामुळे रुपया वधारला. शिवाय खनिज तेलाच्या किमतीत झालेली मोठी घसरण आणि देशांतर्गत भांडवली बाजार वधारल्याने रुपयाला अनुकूलता मिळाली, तर युद्धबंदीच्या वृत्तांमुळे डॉलर निर्देशांक घसरला, असे निरीक्षण मिरे ॲसेट शेअरखानचे संशोधन विश्लेषक अनुज चौधरी यांनी नोंदवले.