देशाच्या सेवा क्षेत्राची सक्रियता सरलेल्या ऑगस्टमध्ये महिनावार म्हणजेच जुलैच्या तुलनेत वाढून तिने पाच महिन्यांतील उच्चांकी स्तर गाठला, असे बुधवारी जाहीर झालेल्या मासिक सर्वेक्षणातून समोर आले. भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणारा ‘एचएसबीसी इंडिया सर्व्हिसेस पीएमआय’ निर्देशांक ऑगस्ट महिन्यात ६०.९ गुणांवर नोंदला गेला. जुलैमध्ये हा गुणांक ६०.३ होता. निर्देशांकाने मार्चनंतरची उच्चांकी पातळी गाठली आहे. उत्पादकता आणि कार्यादेशातील सकारात्मक वाढ यामुळे ऑगस्टमध्ये सेवा क्षेत्राचा वेगाने विस्तार झाला.

सेवा क्षेत्राचा निर्देशांक ५० गुणांवर नोंदला गेल्यास विस्तार तर ५० गुणांखाली नोंदला गेल्यास आकुंचन झाल्याचे मानले जाते. देशातील सेवा क्षेत्रातील महागाईचा दर गेल्या महिन्यात मध्यम राहिला. जुलैच्या तुलनेत त्यात किंचित वाढ नोंदविण्यात आल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. सर्वेक्षणानुसार, जुलैच्या तुलनेत गेल्या महिन्यात रोजगारनिर्मितीचा वेग मंदावला असला तरी एकूण नोकऱ्यांचे प्रमाण चांगले राहिले. भविष्यातील व्यवसाय वाढीबाबत सकारात्मकता दिसून येत आहे.

हेही वाचा : ‘बजाज हाऊसिंग फिन’पाठोपाठ अन्य ‘एनबीएफसी’ही सूचिबद्धतेचा मार्ग अनुसरणार!

दरम्यान, देशातील निर्मिती आणि सेवा क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणारा एचएसबीसी इंडियाचा संयुक्त पीएमआय निर्देशांक ऑगस्टमध्ये ६०.७ गुणांवर नोंदविला गेला. जुलैच्या तुलनेत त्यात बदल झालेला नाही. निर्मिती आणि सेवा क्षेत्रातील किमतीत जुलै महिन्याच्या तुलनेत फारशी वाढ नोंदविण्यात आलेली नाही.