शेकडा सूट आणि रोकडी सवलत. दिवाळीत या गोष्टीला काही औरच महत्त्व असते. पण सूट-सवलतीच्या दिवाळीतच खरेदीसाठी अधिकची किंमत मोजावी लागली तर? दुर्दैवाने हे सणासुदीच्या तोंडावर आणि तेदेखील पारंपरिकपणे थोडथोडके का होईना पण आवर्जून खरेदी केल्या जाणाऱ्या मौल्यवान धातूंबाबत घडताना दिसून येत आहे. सोन्याच्या किमतीला तर पारावारच राहिलेला नाही आणि चांदी तर मोलभाव केले जाईल या स्थितीतच नाही. हे असे कसे? आणि त्याचे विपरीत परिणाम म्हणून एक्सचेंज डिफॉल्ट – Exchange Defaults सारख्या मोठ्या संकटाची विश्लेषकांची भीती कशामुळे याचा ‘प्रतिशब्द’मधून वेध घेऊ.

चांदीमध्ये उल्लेखनीय वाढ सुरू असून, चार दशकांमधील सर्वोत्तम तेजीला तिने गाठले आहे. ऑगस्टपासून सलग नऊ आठवड्यांच्या वाढीमुळे, वर्षातील सर्वोत्तम कामगिरी करणारा मौल्यवान धातू म्हणून तिने स्थान मिळवले आहे. जागतिक बाजारात प्रति औंस ५० डॉलरच्या जवळपास व्यापार सुरू असलेल्या चांदीत आणखी ५० टक्क्यांनी वाढ होऊन, ७५ औंसाचा स्तर लवकरच दिसल्यास ते नवल नसेल, असा मोतीलाल ओस्वाल या दलालीपेढीचा अंदाज आहे. औंस हे मौल्यवान धातूच्या वजनाचे आंतरराष्ट्रीय एकक आहे. एक औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम वजन भरते. त्यामुळे ताज्या ७५ डॉलर औंसाच्या अंदाजाप्रमाणे, चांदी भारतीय रुपयांत, किलोमागे २,३२,८०५ रुपये इतका घाऊक भाव दाखवेल असा अदमास आहे.

पण ही तीव्र भाव तेजी कशामुळे? तर सोन्याच्या तुलनेत चांदीला मागणी ही गुंतवणूक म्हणून वैयक्तिक खरेदीदार आणि औद्योगिक वापर अशी दुहेरी अंगाने आहे. ‘ॲक्सिस एमएफ रिसर्च’च्या अहवालाप्रमाणे, एकीकडे औद्योगिक मागणीने विक्रमी पातळी गाठली आहे, तर दुसरीकडे मागणीला पुरेल इतके जागतिक खाणींचे उत्पादन आणि पुरवठा हे २०२६च्या मध्यालाच जवळपास सुरळीत होण्याचा अंदाज आहे. सारांशात सध्या पुरवठ्यावर ताण आहे. तर हरित ऊर्जा तंत्रज्ञान, सौर पीव्ही, इलेक्ट्रिक वाहने, अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स, ५जी पायाभूत सुविधा आणि सेमीकंडक्टर अशा उदयोन्मुख व मोठी गुंतवणूक होत असलेल्या क्षेत्रात रुपेरी धातूला कधी नव्हे इतकी मागणी वाढली आहे.

भाव तेजीचा आणखी एक पैलू म्हणजे मध्यवर्ती बँकांच्या वर्तनातील अभूतपूर्व बदल. पारंपरिकपणे सोने साठवणुकीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या सौदी अरबनेही आता मोठ्या प्रमाणात चांदी खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. हेदेखील पहिल्यांदाच घडत आहे.

लंडन ओटीसी असो अथवा न्यूयॉर्क कॉमेक्स, शांघाय फ्युचर्स एक्सचेंज असो वा झुरिक, टोक्यो, ऑस्ट्रेलियाचे पर्थ मिंट असो किंवा मुंबईचा झवेरी बाजार जगभरात सर्वांनी या मौल्यवान धातूची नव्याने मागणी नोंदवायचे टाळण्यास सुरू केले आहे. भारतातील कोटक, एसबीआय, यूटीआय आणि आयसीआयसीआय प्रुडेन्शियल या सर्व बड्या म्युच्युअल फंड घराण्यांनी त्यांच्या सिल्व्हर ईटीएफ आणि फंड्स ऑफ फंडातील गुंतवणुका यापुढे नको, असे संदेश त्यांच्या गुंतवणूकदारांना रवाना केले आहेत.

म्युच्युअल फंडांनी त्यांच्या चांदीच्या ईटीएफमध्ये नवीन गुंतवणूक थांबवली आहे. कारण या फंडांना त्यांच्याकडील ईटीएफ युनिट्स इतकी प्रत्यक्ष खरेदी करणे भाग असते आणि प्रत्यक्षात चांदीची उपलब्धता नसल्याने त्यांना नवीन गुंतवणूक आणि नवीन युनिट्सचे व्यवहार थांबवावे लागणे अपरिहार्य ठरले आहे. जगभरात सर्वत्र असेच सुरू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ईटीएफ व्यवस्थापकांना या असाधारण परिस्थितीतून मार्ग काढणे अडचणीचे ठरताना दिसत आहे.

याच कारणाने चांदीमध्ये एक्सचेंज डिफॉल्टसारख्या मोठ्या उत्पातसंभवाचा धोका सूचित केला जात आहे. लंडनचे एलबीएमए आणि न्यूयॉर्कचे कॉमेक्स हे चांदीच्या वायदा सौद्यांची प्रमुख जागतिक केंद्र आहेत. या वायदा बाजारातील कागदी चांदीच्या करारांचे प्रमाण आणि चांदीचा उपलब्ध भौतिक पुरवठा यांच्यात तफावत वाढत असल्यामुळे मुदत पू्र्ण केलेल्या करारांवर धातू भौतिकरीत्या वितरित (डिलिव्हरी) करता येणार नाही. बाजारपेठेची अशी फटफजिती होणे अर्थात डिफॉल्ट होण्याची शक्यता वाढली असल्याचे विश्लेषकांचे संकेत आहेत.

भारतातील बाजाराचे म्हणाल, तर जेथे चांदीच्य़ा वायद्यांचे सक्रियपणे व्यवहार होतात त्या विशेषतः मल्टी कमोडिटी एक्सचेंजसाठी (एमसीएक्स) सध्याची तेजी चिंतेचा विषय बनली आहे. साधारणपणे, वायदा किंमत ही हाजिर बाजार अर्थात स्पॉट मार्केटच्या तुलनेत अधिमूल्यासह व्यवहार करत असते, तेव्हा कॉस्ट ऑफ कॅरीचे संकट निर्माण होते. अर्थात मालमत्तेला एका विशिष्ट कालावधीसाठी धारण करण्यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त खर्चाचा भुर्दंड येतो. सध्याच्या परिस्थितीत, बाजारात प्रचलित किमतींपेक्षा किलोला १५,०००-२०,००० रुपये अधिमूल्यासह, चांदीचे वायदे एमसीएक्सवर सुरू असणे हे बाजारातील प्रणालीतील अंतर्गत ताण दर्शविणारी एक गंभीर समस्या निश्चितच आहे.

मूळात बाजारात जे विक्रेते आहेत, त्यांच्याकडे तरी चांदी भौतिक स्वरूपात उपलब्ध आहे की नाही याचा पडताळा नाही. या संबंधाने स्पष्टता प्रदान करणारी यंत्रणा नाही. त्यामुळे कराराची मुदत संपल्यावर हे विक्रेते चांदी प्रत्यक्ष डिलिव्हरीसाठी उपलब्ध करू शकले नाहीत, तर गंभीर पेचाची स्थिती निर्माण होईल. बाजाराचा बोजवारा अर्थात एक्सचेंज डिफॉल्टची ही स्थिती म्हणूनच विश्वासार्हतेलाच बट्टा लावणारी आणि जागतिक डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणून भारताची प्रतिमा खराब करणारी ठरेल. सारे लक्ष आता ५ डिसेंबरच्या एक्स्पायरी अर्थात सौदापूर्ती तारखेवर, डिलिव्हरीसाठी शिल्लक करारांवर केंद्रित झालेले आहे.

ही संकट परिस्थिती पुन्हा एकदा नियामक त्रुटी आणि अपुऱ्या देखरेख यंत्रणेला उघड्यावर आणणारी आहे. भारतीय बाजार या संकटातून कसे तरून जातील, हे काही दिवसांत ठरेलच. मात्र चांदीचा जगातील सर्वात मोठा ग्राहक म्हणून भारतातील घडामोडीचे सावट जागतिक बाजारपेठांवरही दिसून येईल.

सामान्य गुंतवणूकदारांनी या स्थितीत काय करावे? तज्ज्ञांच्या मते, चांदीच्या पुरवठ्याची स्थिती पाहता नव्याने खरेदी कटाक्षाने टाळावी. अर्थात तशी संधीही उपलब्ध नाही. तर सध्या गुंतवणुकीत असलेल्यांनी अजूनही वाढ होण्याची शक्यता पाहता, पुरवठा सुरळीत होईस्तोवर गुंतवणूक राखून ठेवावी.

ई-मेलः sachin.rohekar@expressindia.com