मुंबई : स्विगीच्या बाजार पदार्पणाबरोबरच सुमारे ५,००० कर्मचाऱ्यांचे नशीब चमकले असून त्यातील ५०० कर्मचारी कोट्यधीश बनले आहेत. कंपनीच्या मसुदा प्रस्तावानुसार, सप्टेंबर २०२४ पर्यंत एकूण एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन्स अर्थात कर्मचारी समभाग मालकी योजनेनुसार २३ कोटी समभाग कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते, ज्याचे मूल्य आयपीओच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेल्या प्रतिसमभाग ३९० रुपयांप्रमाणे सुमारे ९,००० कोटी रुपयांच्या घरात आहे. परिणामी कंपनीशी अनेक वर्षांपासून जोडल्या गेलेल्या ५,००० कर्मचाऱ्यांना याचा लाभ झाला आहे. त्यातील सर्वाधिक समभाग असणारे ५०० कर्मचारी हे कोट्यधीश बनले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवउद्यमी परिसंस्थेमध्ये कर्मचारी समभाग मालकी योजना ही संपत्ती निर्मितीचे साधन ठरली आहे. स्विगीच्या आधी, फ्लिपकार्टने असाच प्रयोग राबविला होता. ज्यामाध्यमातून कर्मचाऱ्यांना तब्बल ११,६०० कोटी रुपये ते १२,५०० कोटी रुपये दिले. तर वॉलमार्टच्या मालकीच्या दिग्गज कंपनीने गेल्या काही वर्षांत १२,००० कोटी रुपये मूल्याचे समभाग पाच वेळा पुनर्खरेदी (बायबॅक) केले होते.

हेही वाचा : एलॉन मस्क यांच्या ‘स्टारलिंक’ला भारतीय अवकाश खुले; मात्र परवाना नियम-शर्तींच्या पूर्ततेनंतरच केंद्रीय मंत्र्यांचे प्रतिपादन

तीव्र घसरणीतही स्विगीचे ८ टक्के वाढीसह पदार्पण तयार खाद्यान्नांचा बटवडा आणि द्रुत व्यापार (क्विक-कॉमर्स) क्षेत्रातील कंपनी ‘स्विगी लिमिटेड’ने बुधवारी समभाग ३९० रुपये या वितरण किमतीच्या तुलनेत ८ टक्क्यांच्या अधिमूल्यासह पदार्पण केले. इतिहासातील तीव्र घसरणीचा बाजारकाळ सुरू असताना, धडकलेल्या नव्या पिढीच्या द्रुत व्यापारातील प्रबळ ‘स्विगी’च्या प्रारंभिक समभाग विक्रीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले होते.

‘स्विगी लिमिटेड’च्या समभागाने राष्ट्रीय शेअर बाजारात ४१२ रुपयांच्या किमतीवर व्यवहार सुरू केले. समभाग मिळविण्यास यशस्वी ठरलेल्या गुंतवणूकदारांना त्याने दिवसअखेरपर्यंत १६.९२ टक्क्यांचा लाभही दाखविला. सत्रातील व्यवहारात तो ४६५.८० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर झेपावला. तर त्याने ३९० रुपये हा दिवसाचा तळही गाठला. दिवसअखेर समभाग १६.९२ टक्क्यांनी म्हणजेच ६६ रुपयांनी वधारून ४५६ रुपयांवर स्थिरावला. दिवसअखेर ‘स्विगी लिमिटेड’चे बाजारभांडवल १,०२,०७३ कोटी रुपयांवर पोहोचले.

हेही वाचा : सरकारी बँकांच्या नफ्यात सहामाहीत २६ टक्के वाढ

सुमारे ११,३२७ कोटींच्या स्विगी प्रारंभिक समभाग विक्रीला अखेरच्या दिवशी ३.५९ पट प्रतिसाद प्राप्त झाला होता. कंपनीने ४,४४९ कोटी रुपयांच्या नवीन समभागांची तर ६,८२८ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची आंशिक समभागाच्या (ओएफएस) माध्यमातून विक्री केली आहे. मसुदा प्रस्तावानुसार, कंपनीने नवीन समभागांच्या विक्रीतून मिळवलेला निधी हा तंत्रज्ञान आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वापरण्याची योजना आखली आहे; नाममुद्रा, विपणन, व्यवसाय जाहिरात कर्ज भरण्यासाठी देखील काही निधी वापरला जाईल.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swiggy 500 employees became crorepati due to employee stock options scheme print eco news css