मुंबई: टाटा समूहातील आघाडीची कंपनी असलेल्या टाटा कॅपिटलचा सुमारे १५,५११ कोटींची प्रारंभिक समभाग विक्रीने बुधवारी शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळविला. या आयपीओच्या माध्यमातून कंपनीने ३३.३४ कोटी समभाग विक्री उपलब्ध केले आहेत. मात्र त्या तुलनेत कंपनीकडे ४५.८४ कोटी समभागांची मागणी नोंदवण्यता आली.

टाटा कॅपिटलने आयपीओच्या माध्यमातून प्रवर्तकांकडील समभागांची विक्री केली आहे. यामध्ये टाटा कॅपिटलची प्रवर्तक कंपनी असलेल्या टाटा सन्सने १०.१ टक्के समभागांची विक्री केली आहे. परिणामी टाटा सन्सला या आयपीओच्या माध्यमातून ६,७१६ कोटींचा धनलाभ झाला आहे. टाटा सन्सने २३ कोटी समभागांची विक्री केली आहे, ज्यामुळे त्यांची टाटा कॅपिटलमधील हिस्सेदारी आयपीओपश्चात ८५.५ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. प्रति समभाग ३४ रुपये या प्रमाणे टाटा सन्सने हे समभाग खरेदी केले होते.

टाटा कॅपिटलने आयपीओसाठी ३१० ते ३२८ रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला होता. सार्वजनिक विक्रीआधी शुक्रवारी देशांतर्गत आणि जागतिक ६८ संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ४,६४२ कोटी रुपयांचा निधी कंपनीने उभारला आहे. सध्या, टाटा कॅपिटलमध्ये टाटा सन्सचा ८८.६ टक्के हिस्सा आहे, तर आयएफसीकडे १.८ टक्के हिस्सा आहे. या आयपीओद्वारे उभारण्यात आलेला निधी कंपनीच्या टियर-१ कॅपिटल बेसच्या वाढीसाठी वापरला जाईल, जेणेकरून भविष्यातील भांडवली गरजा पूर्ण होतील, ज्यामध्ये पुढील कर्जे समाविष्ट आहेत.

सुमारे दोन दशकांच्या अवधीनंतर आलेल्या टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओनंतर, आता भांडवली बाजाराला आजमावणारी टाटा समूहातील दुसरी कंपनी आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीत मजबूत आर्थिक कामगिरी केली, १,०४१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला, जो गेल्या वर्षीच्या ४७२ कोटी रुपयांपेक्षा दुप्पट राहिला आहे. एकूण उत्पन्न जून २०२४ च्या तिमाहीत ६,५५७ कोटी रुपयांवरून ७,६९२ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.