TCS CEO Krithivasan on 12000 employees layoff plans : माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सेवा देणारी देशातील सर्वात मोठी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) पुढील आर्थिक वर्षात दोन टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. यामुळे सुमारे १२ हजार जणांची नोकरी धोक्या आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढलेला वापर यामुळे ही कपात केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. यादरम्यान टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. कृतिवासन यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीतील कर्मचारी कपात ही कृत्रिम बुद्धमत्तेच्या वापरामुळे झालेल्या कार्यक्षमतेतील वाढीमुळे होणार नाही, तर कौशल्याच्या कमतरतेदरम्यान कंपनीतील कर्मचाऱ्यांना नवीन क्षेत्रात हलवण्याच्या मर्यादित संधीमुळे हे केले जात असल्याचे के. कृतिवासन यांनी म्हटले आहे.
टीसीएसचे चीफ एक्झिक्युटीव्ह ऑफिसर आणि मॅनेजिंग डायरेक्टर के. कृतिवासन यांनी मनिकंट्रोलला दिलेल्या विशेष मुलाखतीत याबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले की, “एआय कार्यक्षमतेत २० टक्के वाढ देत आहे, म्हणून हे केले जात नाही. आम्ही ते करत नाही आहोत. कौशल्य जुळत नसल्याने किंवा जेथे आम्हाला वाटते की येथे आपण कोणालाही नियुक्त करू शकलो नाही, अशा वेळी ते केले जाते.”.
“आम्हाला कमी लोक हवे आहेत म्हणून हे होत नाहीये. आम्ही उच्च (गुणवत्तेच्या) प्रतिभेचा शोध घेणे, प्रतिभेला सामावून घेणे, प्रतिभेला प्रशिक्षित करणे सुरूच ठेवू. ते होत राहील. हे मुख्यत: येथील नियुक्तीच्या व्यवहार्यतेबद्दल आहे,” असेही ते पुढे बोलताना म्हणाले.
कर्मचारी कपातीचा मोठा परिणाम हा प्रामुख्याने मध्यम आणि वरिष्ठ पातळीवरील कर्माचाऱ्यांवर होईल. काही एंट्री लेव्हल कर्मचाऱ्यांना फारशी झळ पोहचणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, “आम्ही अनेक लोकांना प्रशिक्षण दिले आहे. आम्ही सुमारे ५,५०,००० लोकांना प्राथमिक कौशल्यांचे, १००,००० लोकांना प्रगत कौशल्यांचे प्रशिक्षण दिले. मुळात, प्रशिक्षण दिल्यानंतर, आम्हाला नियुक्तीच्या व्यवहार्यतेबाबत समस्या आहे. त्यांच्यापैकी काही जणांना प्रशिक्षण दिले जाऊ शकते, पण कदाचित आम्ही लेव्हल १ आणि लेव्हल २ च्या पुढे प्रशिक्षण देऊ शकणार नाहीत, कारण जेव्हा व्यक्ती खूप वरिष्ठ असतो तेव्हा तो कदाचित एन्ट्री लेव्हल कौशल्य वापरू शकणार नाही,” असे के. कृतिवासन म्हणाले.
टीसीएस नोकरीतून कमी केल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची पूर्ण काळजी घेणार आहे. थ्यांना नोटीस पीरियड पे आणि अतिरिक्त सेव्हेरन्स पॅकेज दिले जाईल. याबरोबरच अतिरिक्त विम्याचे लाभ आणि कर्मचाऱ्यांना दुसरीकडे नोकरी मिळवण्याची संधी देखील उपलब्ध करून दिली जाईल.